रावेरच्या पाणीपुरवठ्याला चोरट्यांचे ग्रहण

raver
raver

रावेर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ऐनपूर जवळील कूपनलिकेचे ट्रान्सफार्मर चोरट्यांनी तोडून तांब्याच्या वायरची चोरी केल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या चोरीबाबत निंभोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 


ऐनपूरजवळील तापी नदीवरील कूपनलिकेला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रांसफार्मरची चोरट्यांनी तोडफोड केली. अत्यंत अवजड असे हे ट्रांसफार्मर तेथून दीड किलोमीटर लांब नेऊन त्यातील तांब्याची वायर चोरट्यांनी चोरून नेली. यामुळे कूपनलिकेचा वीजपुरवठा खंडित होऊन शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सध्या दोन छोट्या कूपनलिकावरून शहराला पाणीपुरवठा होत असून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. दरम्यान, चोरी होत असताना ट्रांसफार्मर जवळील एका खोलीत पालिकेचे एकच कर्मचारी जीव मुठीत घेऊन बसले होते.

रावेर शहरापासून आठ नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या तापी किनाऱ्यावर निर्मनुष्य जागी पालिकेचा हा वीज पंप आहे. सात-आठ चोरटे ट्रांसफार्मर तोडफोड करीत असल्याचे कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. मात्र त्याठिकाणी मोबाईलची रेंज नसल्याने बसून राहण्याखेरीज कर्मचारी काहीही करू शकला नाही. या ट्रांसफार्मरच्या दुरुस्तीसाठी सुमारे पावणे दोन लाख रुपये खर्च येत असून पालिका सुमारे पाच लाख रुपये खर्च करून आणखी एक नवा ट्रांसफार्मर विकत घेणार आहे. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि कर निरीक्षक धोंडू वाणी या दुरुस्तीवर लक्ष ठेवून आहेत. याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी प्रकाश तायडे यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com