
आई-वडिलांनीही देशसेवा कर, असे बिंबविल्याने रेणुका पाटीलने खडतर आव्हाने पार करीत स्वप्न साकार केले आहे.
कापडणे : देशभक्ती ही मारूनमुटकून येत नाही. ती जन्मतःच नसानसांमध्ये भरलेली असते. देशभक्तीने प्रेरित होऊन सैन्यदलात दाखल होणाऱ्या तरुणांची कमी नाही म्हणूनच आपण रात्रीची झोप शांततेने घेऊ शकतो. आता तरुणच काय तरुणीही ‘हम भी कुछ कम नही’, असे म्हणत सैन्यदलात दाखल होत आहेत. जिल्ह्यातीलच नव्हे किंबहुना खानदेशातील पहिली तरुणी रेणुका वसंत पाटील सीमा सुरक्षादलात अर्थात बीएसएफमध्ये भरती झाली आहे. देशाविषयी असलेली तळमळ तिच्या बोलण्यातून सातत्याने जाणवते.
आवश्य वाचा- बी.एच.आर. प्रकरण; कंडारेच्या गुप्त बैठकांची चालकाला संपूर्ण माहिती
धनूरचे नाव केले रोशन
धनूर (ता. धुळे) येथील रेणुका पाटीलने अर्थशास्त्रामध्ये उच्च पदवी धारण केली आहे. महाविद्यालयीन जीवनात एनएनसीमध्ये दाखल झाली अन् मेहनतीने ‘बी’ आणि ‘सी’ प्रमाणपत्र मिळविले. बारावीनंतर पोलिस भरतीसाठी प्रयत्न सुरू होते. पदवीनंतर स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास सुरू केला. पण सैन्यदलातच दाखल होण्याची जिद्द होती अन् अखेर बीएसएफची मैदानी परीक्षा आणि लेखी परीक्षेत पात्र ठरली.
सांगलीला प्रशिक्षणासाठी रवाना
सांगली येथील प्रशिक्षण केंद्रात ती मंगळवारी दाखल झाली. खानदेशासह धनूरचे नाव रेणुकाने रोशन केले आहे. रेणुकाने स्वतःसह आई, वडिलांचेही स्वप्न साकार केले आहे. धनूरसह कापडणे परिसरात दर वर्षी दहा-वीस तरुण सैन्यदलात दाखल होतात. देशसेवा करतात. तसेच आई-वडिलांनीही देशसेवा कर, असे बिंबविल्याने रेणुका पाटीलने खडतर आव्हाने पार करीत स्वप्न साकार केले आहे.
वाचा- महाआघाडी कागदावर; भाजप निकालात ‘स्ट्राँग’
प्रत्येक जण आपल्या परीने देशसेवा करीत असतात; पण हातात बंदूक घेऊन, मरणाच्या घोड्यावर स्वार होऊन शत्रूशी लढणे अन् देशवासीयांना आरामात झोप घेऊ देणे, ही खरी देशसेवा आहे. तरुणींसाठी सैन्यदल जरी आव्हानात्मक क्षेत्र आहे; पण ते स्वीकारून शत्रूलाच आव्हान निर्माण करण्याची जिद्द बाळगली पाहिजे.
-रेणुका पाटील, धनूर (ता. धुळे)
संपादन- भूषण श्रीखंडे