esakal | साक्री लसीकरण केंद्रावर गोंधळ..केंद्रच सुपर स्प्रेडर होण्याची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

vacination craud

साक्री लसीकरण केंद्रावर गोंधळ..केंद्रच सुपर स्प्रेडर होण्याची भीती

sakal_logo
By
धनंजय सोनवणे

साक्री : एक मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांचे कोविड लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर येथील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून यातून गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. तसेच काही वेळा वादाचे प्रसंग देखील त्या ठिकाणी तयार होत असल्याने शहरात लसीकरण केंद्र वाढवुन ही गर्दी कमी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

हेही वाचा: वय वर्षे 80 स्कोअर 15..तरी आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनावर मात

एक मेपासून अठरा वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय झाल्यानंतर सर्वत्र लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. येथील ग्रामीण रुग्णालय येथे देखील सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर देखील लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. यातच लसीचा अत्यल्प पुरवठा होत असताना शेकडोच्या संख्येने लस घेणार्‍यांची गर्दी होत असल्याने यातून मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. अनेक वेळा काही वादाचे प्रसंग देखील उद्भवत आहेत. यामुळे मुबलक लस उपलब्ध करून देत असतानाच लसीकरण केंद्र वाढवून एकाच ठिकाणी होणारी ही गर्दी देखील कमी करण्याची गरज आहे.

केंद्रच सुपर स्प्रेडर ठरण्याची भीती

शहरात सध्या केवळ ग्रामीण रुग्णालय येथील एकाच लसीकरण केंद्रावर लस देण्यात येत असल्याने याठिकाणी शेकडोच्या संख्येने लोक येत आहेत. या ठिकाणी येणार्‍यांना उभ राहण्यास देखील पुरेशी जागा नाही, महिलांना उभं राहण्यास स्वतंत्र व्यवस्था केलेली नाही, अनेक जेष्ठ नागरिक ताटकळत उभे राहत असल्याने त्यांना बसण्याची कुठलीही व्यवस्था नाही, तसेच उन्हापासून बचावासाठी देखील पुरेशी व्यवस्था याठिकाणी करण्यात आलेली नाही. यात सोशल डिस्टंसिंगचा तर पुरता फज्जा उडाला असून, हे लसीकरण केंद्र कोरोनाचे सुपर स्प्रेडर केंद्र होण्याची भीती व्यक्त होते आहे.

हेही वाचा: चोर तर चोर..वरून शिरजोर ! काळा बाजार करणाऱ्यांनी पोलिसांनाच केली मारहाण

हस्तकांना थेट प्रवेश?

दरम्यान याठिकाणी ऑनलाइन नोंदणी करून देखील वेळेत नंबर लागत नाही, तसेच याठिकाणी देण्यात येणाऱ्या टोकन नुसार देखील अनेक वेळा नंबर लागत नसताना काही हस्तकांच्या मार्फत वशिलेबाजी करून मात्र थेट प्रवेश दिला जात असल्याचा आरोप अनेकांकडून होत आहे. अनेकजण विनाकारण लसीकरण केंद्राच्या आतमध्ये वावरताना दिसत असून, त्यांना कोण प्रवेश देतंय हा प्रश्न निर्माण होतोय. ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचे ढिसाळ नियोजन पूर्णपणे कोलमडून पडत असून यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. तसेच शहरात आणखीन तीन ते चार लसीकरण केंद्र सुरू करून ही गर्दी कमी करण्याची गरज आहे.

संपादन - भूषण श्रीखंडे

loading image