लोकसहभागातून स्वच्छता व खोलीकरणानंतर कान नदी पात्राचे बदलले रूप

धनंजय सोनवणे
रविवार, 10 जून 2018

साक्री : गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने घाण पडून राहिल्याने व गाळ साचून राहिल्याने अतिशय अस्वच्छ व अरुंद बनलेल्या येथील कान नदी पात्राची नुकतीच स्वच्छता व खोलीकरण करण्यात आले. शहरातील पर्यावरण प्रेमी तरुणांनी एकत्रित येवून लोकसहभागातून ही मोहीम राबविली. नदीची स्वच्छता व खोलीकरण झाल्यानंतर हा परिसर अतिशय सुंदर व मनमोहक दिसू लागला असून, नदी पात्रातील घाण तसेच गाळ काढल्याने पाण्याची साठवण क्षमता देखील वाढणार आहे.

साक्री : गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने घाण पडून राहिल्याने व गाळ साचून राहिल्याने अतिशय अस्वच्छ व अरुंद बनलेल्या येथील कान नदी पात्राची नुकतीच स्वच्छता व खोलीकरण करण्यात आले. शहरातील पर्यावरण प्रेमी तरुणांनी एकत्रित येवून लोकसहभागातून ही मोहीम राबविली. नदीची स्वच्छता व खोलीकरण झाल्यानंतर हा परिसर अतिशय सुंदर व मनमोहक दिसू लागला असून, नदी पात्रातील घाण तसेच गाळ काढल्याने पाण्याची साठवण क्षमता देखील वाढणार आहे.

येथील कान नदी पात्र मोठ्या प्रमाणावर अस्वच्छ व अरुंद झालेले होते. याची स्वच्छता व खोलीकरण करण्यासंदर्भात शहरातील पर्यावरण प्रेमी तरुणांनी पुढाकार घेतला व लोकसहभागातून या नदी पात्राची स्वच्छता व खोलीकरण मोहीम राबविली. या मोहिमेत त्यांना शहरासह तालुक्यातील अनेक दानशूर दात्यांनी भरभरून मदत केली तसेच तहसीलदार संदीप भोसले व नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ.मयूर पाटील यांचे देखील मोठे सहकार्य या कामात लाभले. या मोहिमेदरम्यान कान नदीच्या उत्तरेस तसेच दक्षिणेकडे असलेल्या पात्रातील घाण तसेच गाळ मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला व यामुळे हे पात्र अतिशय स्वच्छ व सुंदर दिसू लागले आहे.

कमी खर्चात व विक्रमी वेळेत काम पूर्ण

कान नदी स्वच्छता व खोलीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर अवघ्या 8 दिवसात व केवळ दीड लाख खर्चात हे काम पूर्ण करण्यात आले. दररोज सरासरी 3 ते 4 जेसीबी मशीन व अखेरच्या टप्प्यात एक दिवस पोकलँड मशीनचा या कामात उपयोग करण्यात आला. यात पुलाच्या उत्तर व दक्षिणेकडच्या नदी पात्रातून सुमारे 300 हून अधिक ट्रॅक्टर गाळ तसेच घाण काढण्यात आली. यातून नदी पात्राची सुमारे 25 ते 30 फुट रुंदी वाढवण्यात आली असून, 8 ते 10 फुट खोली देखील करण्यात आली आहे. तसेच नदी पात्रात ज्या ठिकाणी वाळू होती, त्या भागात वाळू तशीच कायम ठेवून जेसीबी मशिनच्या सहाय्याने नदी नांगरण्यात आली आहे. या कामामुळे नदी पात्रातील पाण्याची साठवण क्षमता वाढणार असून, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होण्यास देखील याची मदत होणार आहे. या कामामुळे शहराचा पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होण्यात मदत होणार आहे.

सोशल मीडियातून मदत

ऐरवी केवळ मनोरंजन व वेळ घालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सोशल मिडीयाची या कान नदी खोलीकरण कामात मोठी मदत झाली. या कामासाठी तयार करण्यात आलेल्या “मिशन कान नदी खोलीकरण” या व्हाटस अप ग्रुपच्या माध्यमातून शहरासह तालुक्यातील दात्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले व या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत दात्यांनी केली.  

घाण टाकण्यास प्रतिबंद करावा

दरम्यान कान नदी पात्र स्वच्छ केल्यानंतर आता हे पात्र असेच कायम ठेवण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने सहकार्य करण्याची अपेक्षा हे काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी व्यक्त केली आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात घाण, निर्माल्य तसेच अनेक वेळा सांडपाणी देखील सोडले जात असते. यामुळे नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. निदान आता तरी नगरपंचायत प्रशासनाने यावर कठोर उपापयोजना करून नदी पात्र अस्वच्छ करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून नदी स्वच्छ व सुंदर ठेवण्यात सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: marathi news sakri dhule kan river kholikaran