साक्रीकरांची केवळ दोन आवर्तनांवर भागली तहान 

साक्रीकरांची केवळ दोन आवर्तनांवर भागली तहान 

साक्री :  धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी सर्वत्र समाधानकारक पावसामुळे यंदा बहुतांश भागात मेअखेरपर्यंत मुबलक पाणीसाठा राहिल्याने टंचाईच्या झळा जाणवल्या नाहीत. साक्री शहरात बहुतांश भागात मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने टंचाईच्या झळांपासून दिलासा मिळत आहे. यातच आता जून महिना सुरू झाल्याने लवकरच मॉन्सून धडकण्याची शक्‍यता आहे. तसेच शहरात उन्हाळ्यात काही भागात अडचण आली; परंतु मालनगाव प्रकल्पातून केवळ दोन आवर्तनावर शहरवासीयांची तहान भागल्याचे नगरपंचायतीचे गटनेते ज्ञानेश्‍वर नागरे यांनी सांगितले. 

आगामी वर्षभर दिलासा 
गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाणात सातत्याने कमी-कमी होत गेल्याने जलस्तर मोठ्या प्रमाणात खालावला होता. यातच दोन वर्षांपूर्वी अत्यल्प पाऊस झाल्याने गेल्या वर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. साक्री शहरातही गेल्या वर्षी डिसेंबरपासूनच टंचाई जाणवली होती. यातून मग बहुतांश साक्रीकरांना टॅंकरचे विकतचे पाणी घ्यावे लागले होते. यंदा मात्र यात मोठ्या प्रमाणात फरक पडल्याचे दिसून आले. 2019 या वर्षात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे मेअखेरपर्यंत मुबलक पाणीसाठा शिल्लक राहिल्याने टंचाईच्या झळा काहीशा कमी जाणवल्या. 

केवळ दोनच आवर्तने 
शहराच्या भागात यंदा गरजेइतके पाणी उपलब्ध झाले, तर बहुतांश भागात दिवसाआड पाणी उपलब्ध झाले. यामुळे यंदा शहरात फारसे टॅंकर दिसून आले नाहीत. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी नगरपंचायतीकडून मालनगाव प्रकल्पात दरवर्षी 79.15 एमसीएफटी पाणी आरक्षित करण्यात येत असते. हे पाणी गरजेनुसार चार ते पाच आवर्तनांमधून आणले जाते. यंदा आतापर्यंत केवळ दोनच आवर्तन घेण्यात आली. यात मार्चमध्ये एक व एप्रिलमध्ये एक आवर्तन घेत आरक्षित पाणी आणले आहे. यामुळे यंदा टंचाईच्या झळांपासून शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

उपाययोजनांचा फायदा 
गेल्या काही वर्षांपासून टंचाई निवारणासाठी प्रशासकीय पातळीसोबतच वैयक्तिक पातळीवर अनेकांचे प्रयत्न सुरू होते. साक्री शहरातही सामाजिक संघटना व पर्यावरणप्रेमी तरुणांनी जलपुनर्भरण, जलसंधारणचे विविध उपक्रम राबविल्याने पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. दोन वर्षांपूर्वी शहरालगत वाहणाऱ्या काननदी पात्राचे लोकसहभागातून खोलीकरण केले होते, तर गेल्या वर्षीही विविध समविचारी लोकांनी एकत्र येऊन मिशन जलपुनर्भरण चळवळ राबवत शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम मोठ्या प्रमाणात करून घेतले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com