esakal | खाऊच्या पैशातून दिले वस्त्र; चिमुकल्‍याने कोणासाठी राबविला उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

corona yodha

कोरोना सारख्या महामारीत अहोरात्र राबणाऱ्या साऱ्याच योद्ध्यांचे करावं तेवढं कौतुक कमी आहे. परंतु आपल्यापरीने त्यांच्या चेहऱ्यावर थोडा आनंद निर्माण करावा; या उद्देशाने साक्री येथील कोविड सेंटरमध्ये असलेल्या १०८ रुग्णवाहिकेच्या तीन चालकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा वस्त्र भेट देऊन सत्कार केला. 

खाऊच्या पैशातून दिले वस्त्र; चिमुकल्‍याने कोणासाठी राबविला उपक्रम

sakal_logo
By
जगदीश शिंदे

साक्री (धुळे) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयुष्यातील सुख- दुःख विसरून मागील साडेपाच महिन्यापासून चोवीस तास रूग्णवाहिकेसाठी सेवा देत आहे. आपल्‍या वाट्याला आलेल्या कर्तव्यातून रूग्णसेवेत आनंद शोधणाऱ्या चालकांचा सन्मान व्हावा; यासाठी साक्री येथील रहिवासी तथा जवाहर नवोदय विद्यालयाचा सातवीतील विद्यार्थी अध्ययन शिंदे याने जमविलेल्‍या खाऊच्या पैशातून खऱ्या कोरोना योद्ध्यांना आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना वस्त्रभेट दिली.

बोडकीखडी (ता.साक्री) माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश शिंदे आणि साक्री येथील नगरसेविका तथा साक्री तालुका विधायक समितीच्या संचालिका ॲड. पुनम शिंदे- काकुस्ते यांचा चिरंजीव अध्ययन याचा आज (ता.१८) वाढदिवस होता. या पार्श्वभूमीवर कोरोना सारख्या महामारीत अहोरात्र राबणाऱ्या साऱ्याच योद्ध्यांचे करावं तेवढं कौतुक कमी आहे. परंतु आपल्यापरीने त्यांच्या चेहऱ्यावर थोडा आनंद निर्माण करावा; या उद्देशाने साक्री येथील कोविड सेंटरमध्ये असलेल्या १०८ रुग्णवाहिकेच्या तीन चालकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा वस्त्र भेट देऊन सत्कार केला. 

वर्षभरात साचलेले पैसे सत्‍कारणी
चालकांच्या सत्कारासाठी लागणारे वस्त्र हे अध्ययनने मागील वर्षभरात जमविलेल्या खाऊच्या पैशातून खरेदी करण्यात आले होते. आजच्या सत्कारामुळे रमेश भोये, गुलाब भोये आणि भूपेंद्र बाविस्कर या तीनही रुग्णवाहिका चालकांनी अतिशय भावनिक होत ऋण व्यक्त केले. मागील पाच महिन्याच्या कालावधीत कोरोना सारख्या महामारीत परिवाराकडे दुर्लक्ष करीत, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत साक्री येथील कोविड केअर सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी बांधव सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहेत. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करता यावी; यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी अध्ययन शिंदे, पूनम शिंदे-काकुस्ते, डॉ. गणेश सोनवणे, शरद चव्हाण, जी. टी. मोहिते, करूणा पाटील, संगपाल मोरे आदी उपस्थित होते.

चालकांनी मांडले अनुभव
रुग्णवाहिका चालक रमेश भुऱ्या भोये यांनी सांगितले की, १२ एप्रिलपासून आम्ही तीनही चालक २४ तास या ठिकाणी संशयित रुग्णांचे स्वॅब घेणे, दाखल झालेल्या रुग्णांना रुग्णालयापर्यंत आणणे तसेच रुग्णालयातून घरी सोडणे असे काम करत आहे. या कामात निश्चितच आनंद मिळतो. मात्र कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांप्रती समाजाने आदरभाव दाखवावा. येथील कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी ऊर्जा मिळावी; यासाठी समाजाने देखील सहकार्याची भावना ठेवावी. आज आपण हाती घेतलेल्या उपक्रमातून निश्चितच काम करण्याची अधिक प्रेरणा आम्हास मिळेल.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top