समृद्धी महामार्गालगत आठ लाख झाडांची लागवड 

residentional photo
residentional photo


मुंबई : महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची उभारणी करताना होणारी वृक्षतोड व त्यामुळे निसर्गाचे होणारे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे महामार्गालगत आठ लाख झाडांची लागवड करण्यात येईल. त्यासाठी लखनऊमधील राष्ट्रीय वनसंपत्ती संशोधन संस्थेचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. 
महामार्गालगत किलोमीटरला 1 हजार 326 झाडे लावली जाणार आहेत.

701 पैकी 600 किलोमीटरवर झाडांची लागवड होईल. तसेच प्रस्तावित महामार्गावरील इंटरचेंज, रेस्ट एरिया, वेसाइड ऍमेनिटीज अंतर्गत येणा-या भूभागावरील पट्यातही वृक्षांची लागवड केली जाणार आहे. राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेने महामंडळाला मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शवली आहे. समृद्धी महामार्ग दहा जिल्हे, 26 तालुके आणि 390 गावांतून जाणार आहे.

प्रत्येक ठिकाणची माती, हवा, पाणी, पर्जन्य प्रमाण, हवामानाची स्थिती या सगळ्याचा अभ्यास करून महामार्गाच्या दुतर्फा नेमकी कोणती झाडे लावली जावीत याचा अभ्यास राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था करणार आहे. संस्थेने केलेल्या शिफारशींनुसार रोपवाटिका विकसित केली जाणार असून त्यानंतर महामार्गाच्या दुतर्फा संस्थेने सूचवलेली झाडे लावली जातील, याची खबरदारी महामंडळ घेणार आहे. 

संशोधन संस्थेची उद्दिष्टे 
नॅशनल बोटॅनिक गार्डन्स असे यापूर्वी नामकरण असलेली राष्ट्रीय वनसंपत्ती संशोधन संस्था ही दिल्लीतील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद या संस्थेच्या अधिपत्याखाली येते. वनस्पती शास्त्राचा सखोल अभ्यास करण्याबरोबरच विविध प्रकारच्या वनस्पतींच्या संवर्धनासाठी तंत्रज्ञान विकसित करणे, नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींचे जतन करून त्यांच्या वृद्धीसाठी प्रयत्न करणे, विविध प्रदेशात-वातावरणात टिकाव धरणा-या वनस्पतींचे संगोपन करून त्यांची लागवड संबंधित प्रदेशात मोठ्याप्रमाणात करणे, वनस्पतींसंबंधी तंत्रवैज्ञानिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणे ही संस्थेची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. 

""समृद्धी महामार्गाची उभारणी करताना पर्यावरणाचे यथोचित संवर्धन व्हावे, या मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ठाम आहे. त्यामुळेच महामार्गाच्या उभारणीदरम्यान, अधिक वृक्षलागवड करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. भारतीय रस्ते परिषदेच्या नियमात महामार्गादरम्यान प्रति किलोमीटर अंतरावर 583 झाडे लावावीत, असे नमूद आहे. परंतु आम्ही समृद्धी महामार्गाची उभारणी करताना त्यापेक्षा कितीतरी अधिक झाडांची लागवड करणार आहोत'' 
- राधेश्‍याम मोपलवार (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com