देशात 2014 सारखी हवा नाही, पण सत्ता आमचीच- संजय राउत यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

नाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच मिळवेल.असा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राउत यांनी केला. 

नाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच मिळवेल.असा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राउत यांनी केला. 
शिवसेनेतर्फे एसएसके हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत झाली. त्यावेळी राऊत यांनी विविध मुद्यांवर संवाद साधला. आमदार प्रा.देवयानी फरांदे,संपर्कप्रमुख भाउसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, महानगरप्रमुख महेश बडवे, समीर मराठे उपस्थित होते. श्री राउत म्हणाले, राज्यातील वेगवेगळ्या संघातील माहीती घेत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकच्या जागेवर विशेष लक्ष आहे. निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांचा कस लागणार आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे देशात देशभक्तीचे वातावरण आहे. लोकांना देशात मजबूत आघाडीचे सरकार हवे आहे. कॉग्रेसकडे पंतप्रधान पदाचे पाच उमेदवार असल्याने लोकांत संभ्रमावस्था आहे तर महायुतीतील शिवसेनेसह इतर प्रादेशिक पक्षांना काही दिल्लीत नेते व्हायचे नाही. त्यामुळे आमचा एकमेव नरेंद्र मोदी यांना पाठिंबा आहे. 

विकासाचा मुद्या कायम 
पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासावर बोलत नसल्याच्या आरोपाचा इन्कार करत ते म्हणाले, महायुतीने विकासाचा मुद्दा सोडलेला नाही. राममंदीर, कुख्यात दाउद इब्राहीमसह 15 जणांना देशात आणणे यासह जुने मुद्दे सोडले नाहीत. जेट, बीएसएनएलआणि एअर इंडिया या तोट्यातील कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मंदीराबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार, 65 एकर जागेवर मंदीर उभारणी करुन राहिलेल्या 2 एकर जागेबाबत न्यायालयीन लढाई आम्ही यापुढे कायम ठेवणार आहोत. 

रिपाईचे सर्व गट महायुतीत यावे 
पूर्वी भाजपवर टिका करणारे राउत आणि आता युतीत भाजपसाठी मत मागणारे राउत या दोन स्क्रिप्ट बदलेल्या भूमिकांविषयी त्यांनी, लोकभावना विचारात घेउनच भाजपसोबत शिवसेनेने युती केली आहे. वंचित बहुजन आघाडी ही स्वतंत्र आहे. ती ऍड प्रकाश आंबेडकर यांची भूमिका आहे. रिपब्लिकन पक्षाचे सगळे गट निस्तेज झाल्याने वंचित बहुजन आघाडीला चांगले वातावरण राहिल. असे रामदास आठवले यांनीही निरीक्षण नोंदवलेले आहे. आमचा एमआयएम ला विरोध आहे. रिपब्लिकन गटांनी एकत्र येउन महायुतीत सहभागी व्हावे अशी आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे.  
 

Web Title: marathi news sanjay raut