उन्हाचे चटके सोसत देवी भक्तांचे जत्थे गडाकडे मार्गस्थ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

मालेगाव कॅम्प : ‘बोल अंबे की जय’, ‘सप्तशृंगी माता की जय’ अशा असंख्य घोषणांचा जयजयकार करत श्रध्दाळू भाविक भक्त उन्हाचे चटके सोसत आई भगवतीच्या दर्शनाला निघाले आहेत. वाढत्या तापमानात लाही लाही होत असतांना कुठे थोडासा विसावा तर कुठे दोन घास घेवून रमत गमत गडाकडे मोठ्या संख्येने मार्गस्थ हाेत आहेत.

मालेगाव कॅम्प : ‘बोल अंबे की जय’, ‘सप्तशृंगी माता की जय’ अशा असंख्य घोषणांचा जयजयकार करत श्रध्दाळू भाविक भक्त उन्हाचे चटके सोसत आई भगवतीच्या दर्शनाला निघाले आहेत. वाढत्या तापमानात लाही लाही होत असतांना कुठे थोडासा विसावा तर कुठे दोन घास घेवून रमत गमत गडाकडे मोठ्या संख्येने मार्गस्थ हाेत आहेत.

  या भक्तीभावात मालेगावकरांनी सामाजिक सेवेचे व्रत स्विकारत मदतीसाठी विविध सोयी-सुविधा, थंडपाणी, पेय, विविध फळे, नाश्‍ता, औषधे, निवारा आदी वाटप करण्याची मोठी लगबग सुरु झाली आहे. महामार्गापासून दरेगाव मार्ग, मोसमपुल, टेहरे चौफुलीपर्यंत मोठ्या प्रमाणात दानशुरांनी विविध मदतीचे व वस्तु वाटप करण्याचे स्टॉल लावलेले आहेत. मुस्लीम बांधवही मदतीत मागे नाहीत.

गेल्या अनेक वर्षापासून शहरातील व्यावसायिक विविध मंडळे, सामाजिक संस्था सातत्याने अल्पोपहार व भोजन, थंडपेय आदींची व्यवस्था करतात. खान्देश भागासह मध्यप्रदेशातही मोठ्या प्रमाणात अबाल वृध्दांसह महिला, युवक, बालगोपाल आदी पायी वारी करतात.     

सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या शहरात मालेगावकर एकतेचा सद्‌भाव दाखवत अनेक मुस्लीम बांधवही या सेवा कार्यात सहभाग घेतात. यामध्ये शिरपूर येथून आलेल्या रथाचे यथोचित स्वागत मुस्लीम बांधवांनी केले. सुत व यार्न मर्चंट व ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे मानसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात खाद्य पदार्थ वाटपात मुस्लीम तरुणांनी सहभाग घेतला. शहराच्या पुर्व भागात जुन्या महामार्गावर अनेक मुस्लीम बांधवांनी चौका चौकात पाणी व सरबत वाटप केले.
 

सेवाभावीवृत्तीचे दर्शन
श्रध्दा व भक्तभावाच्या या वातावरणात अनेक व्यावसायिक सहभागी होता येत नसले तरी देवीच्या भक्तांसाठी दोन-तीन दिवस आपल्याच दुकानाजवळ सेवा देतात. थंड पाण्यासह विविध सोयी-सुविधा पुरवतात. येथील इंडियन एनएक्स या दालनातर्फे गडावर निघालेल्या भाविकांच्या मोबाईलची काळजी घेऊन मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन देत मोबाईल धारकांची सोय केली. तसेच टरबुजचे वाटप करण्यात आले. यार्न असोसिएशनने थंड ताक वाटप केले

Web Title: marathi news saptshrungi devi bhakt