शेतकऱ्यांचा एकजुटीने रस्त्याचे भवितव्य उजाळले !

रमेश पाटील | Tuesday, 8 December 2020

शेवटी त्याच रस्त्या लगत असलेल्या शेतकऱ्यांनी एकत्रित होत लोकवर्गणी गोळा करून लोकसहभागातून रस्ता तयार करण्याचे ठरवले.

सारंगखेडा : अनेक वर्षापासून रस्ता व्हावा यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिझवले मात्र, प्रशासनाच्या आश्वासना पलिकडे कोणतेही फलित मिळाले नाही. शेवटी शासनाच्या नाकर्ते धोरणावर विसंबून न राहता परिसरातील शेतकऱ्यांच्या एकजुटीतून लोकवर्गणीच्या माध्यमातून आठ किलोमीटरचा रस्त्याचे भवितव्य उजाळले.

आवश्य वाचा- सुरत वरून पळून आल्या; फसवणूक झाली, मात्र पोलिसांमूळे दोघी पालकांकडे सुखरूप -
 

येत्या काही दिवसातच हा रस्त्या शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना वापरण्यासाठी सज्ज होत आहे. अधिकाऱ्यांनी ठोकारलेल्या वडाळी ते खापरखेडा रस्ता तेथील शेतकऱ्यांच्या मनोबलातून साकारत आहे. शासनाच्या विकासाभिमूख प्रशासनाची लक्तरे या निमित्ताने या रस्त्याला टांगली गेल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

Advertising
Advertising

वडाळी (ता. शहादा) ते खापरखेडा या गावाला सध्या कोंढावळ मार्गे जावे लागते. हे अंतर बारा किलोमीटर आहे. मात्र, कोंढावळ मार्गे न जाता वडाळीहून सरळ गेल्यास आठ किलोमिटर अंतरावर खापरखेडा आहे. त्यातून चार किलोमिटर अंतर कमी होते. मात्र या मार्गाने जातांना शेतकऱ्यांना रस्त्याच्या दूरावस्थेमुळे तारेवरची कसरत करावी लागते. पाय वाटेने किंवा जेमतेम बाभळीच्या झाडांच्या काटेरी झुडपांमधून जेमतेम वाट काढत जावे लागत होते. गत काही वर्षापासून शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांपासून शासन दरबारी मागणी करीत सातत्याने पाठपुरावा केला. कुणालाही त्यांच्या व्यथेची दखल घ्यावीशी वाटले नाही. शेवटी त्याच रस्त्या लगत असलेल्या शेतकऱ्यांनी एकत्रित होत लोकवर्गणी गोळा करून लोकसहभागातून रस्ता तयार करण्याचे ठरवले. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अभिजीत पाटील यांनी डिझेल उपलब्ध करून देण्यासह जेसीबी, पोकलेन, डंपर देत सामाजिक कार्यात सहभाग नोंदवत परिसरातील देणगी दात्यांनी साधनसामुग्री उपलब्ध करून दिल्याने प्रत्यक्ष कामात सुरुवात झाली. सदरचे काम पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे वडाळीसह परिसरातील शेतकऱ्यांनी हा रस्ता आता वापरात येणार असल्याने समाधान व्यक्त करीत आहेत.

शेतकऱ्यांनी लावल्या कामासाठी आपआपली ड्युटी

रस्त्याचे काम हे आपले घरचेच काम समजून शेतकऱ्यांनी जेसीबी, पोकलेन, डंपरच्या वाहनचालकांना आळीपाळीने आपल्या घरून भोजनाची व्यवस्था केली. संबंधित मशनरीला डिझेल आणून पोचवणे आदींची काम क्रमाक्रमाने वाटून घेतले. यासाठी वडाळीचे माजी उपसरपंच अभयगिरी गोसावी, रतिलालभाई पटेल हिरालाल माळी, शांताराम पाटील, नथा गोसावी, मधुकर कणखरे, आदींसह शेकडो शेतकर्‍यांनी हातभार लावला. त्यांनी केलेल्या परिश्रमाचे फलित लवकरच दृष्टीपथास येत आहे.

वाचा- नरडण्यातील तीन खुनांची उकल होणार ? की.. 
 

अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या वडाळी ते खापरखेडा रस्त्याचे काम लोकसहभागातून करून आता पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. यातून शेतकरी व गावकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. रस्त्याच्या उर्जितावस्थेसाठी शेतकर्‍यांनी अनेक वर्षांपासून शासन दरबारी व राजकीय नेते मंडळीकडे गाऱ्हाणे मांडले. मात्र सर्वांनी दुर्लक्ष केले. शेवटी शेतकऱ्यांनीच एकजूट दाखवित एका बैठकीत आपला रस्ता आपणच तयार करायचा निर्णय घेत लोकसहभागातून प्रत्यक्ष रस्ता दुरुस्तीला प्रारंभ केला.
- अभय गोसावी, माजी उपसरपंच, वडाळी  
 

संपादन- भूषण श्रीखंडे