गाड्या नाही म्हणून काय झाले...सासरवाडीच्या पाहुणचारासाठी घोड्यावरून प्रवास 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

सासुरवाडीचे बोलावणे आले की, जावेच लागते; असे म्हटले जाते. पण सध्याच्या कोरोना व्हायरस लॉकडाउनच्या काळात वाहतूक व्यवस्थाच नाही. म्हणून काय झाले...सासुरवाडीचे बोलावणे आलेच आहे; तर त्यांची भेट कशी घ्यायची आणि तेथील पाहुणचार घेण्यासाठी महाशयांनी चक्‍क घोड्यावरची सवारी करत सासुरवाडी गाढली.

सारंगखेडा : कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव वाढण्याच्या भीतीने संपूर्ण जग हादरले आहे. राज्यात दोन आठवड्यांपासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे वाहतूक व्यवस्था बंद आहे. पण आराळे (ता. नंदूरबार) येथील वृध्द सासरवाडीच्या लोकांना भेटण्यासाठी चक्क घोड्यावरुन प्रवास करुन येत होता. सासरवाडीत पाहूणचार करण्यासाठी गेलो होतो; असे अश्ववर आरूढ झालेल्या बाबाने मोठ्या ऐटीत सांगितले. 

 

कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे तब्बल दोन आठवड्यापासून वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. बस किंवा खासगी वाहतूक बंद आहे. शिवाय शहादा- दोंडाईचा रस्त्यावर सारंगखेडा तापी पुलाजवळ पोलीसांनी नाकाबंदी करून अत्यावश्‍यक वाहनांनाच प्रवेश दिला आहे. दुचाकी फिरविणाऱ्यांना पोलीस दंडूका देतात. यामुळे कोणीही एका गावातून दुसऱ्या गावात जाणे शक्‍यत नाही. 

सासरवाडीला गेलो होतो बा..
आराळे (ता. नंदूरबार) येथील छगन गिरासे (वय 70) यांनी चक्क घोड्यांवर प्रवास सुरू केला आहे. कुठेही नातलगाकडे तोंडाला रुमाल बांधून प्रवास करतात. घोड्यावर बसून प्रवास केल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग ही होणार नाही. आज (ता. 6) सकाळी सारंगखेडा पुलाजवळ पोलीसांनी घोड्यावर बसून येत असलेल्या बाबाला विचारले कुठून येत आहेत. तेव्हा बाबा म्हणाले बिलाडी (ता. शहादा) येथे सासरवाडीला मला बोलविले होते. तेथे पाहूणचारासाठी गेलो होतो. 

दोन आठवड्यांपासून नातलगांच्या भेटी 
जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था झाली नाही. दुचाकीवाल्यांना पोलीस जाऊ देत नाही. म्हणून दोन दिवस मुक्काम करून परत गावाकडे आराळे (ता. नंदूरबार) जात आहे. मी नेहमीच शेतात जाण्यासाठी याच घोड्यावर जातो. सध्या दोन आठवडयापासून अनेक ठिकाणी नातेवाईकांना भेटण्यासाठी, दारावर जाण्यासाठी घोड्यावर जात असल्याचे बाबा म्हणत पुलावरून टपटप पुढे निघाले... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sarangkheda old man horse sawari Mother in law village lockdown