सटाण्यात गादी सेंटरमध्ये आगीचे तांडव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

अग्निशमन विभागाने ३ फेऱ्या मारूनही आग आटोक्यात येत नसल्याने मालेगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले.

सटाणा : सटाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील कंधाणे फाट्यालगत प्रिन्स गादी सेंटरला काल (ता.१३) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागून २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे आग विझवण्यासाठी कोणतीही मदत मिळत नव्हती. सटाणा नगरपालिका व मालेगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. मात्र दोन्हीही बंब घटनास्थळी नादुरुस्त झाल्याने आग विझू शकली नाही. कोणतीही पर्यायी व्यवस्था न मिळाल्याने आगीची तीव्रता वाढून दुकानातील कापूस व लोकर संपूर्णपणे जळून खाक झाले.
येथील मुक्तार हबीब मन्सुरी यांचे कंधाणे फाट्यावर प्रिन्स गादी सेंटर नावाचे होलसेल लोकर आणि कापूस विक्रीचे दुकान आहे. येथून तालुक्यातील जवळपास सर्वच गादी व्यावसायिक लोकर, कापूस व कापड खरेदी करतात. त्यामुळे मन्सुरी यांच्या दुकानात २५ ते ५० लाख रुपये किमतीचे साहित्य पडलेले असते. त्यातूनच होलसेल व रिटेल दराने खरेदी व्यवहार सुरु असतो. काल रात्री नेहमीप्रमाणे मन्सुरी यांनी दुकान बंद केले. रात्री ११.३० च्या सुमारास या दुकानातून धूर निघत असल्याचे नजीकच्या हॉटेलमधील ग्राहकांना लक्षात आले. यापैकी एकाने दुकानमालकाला फोन करून याबाबत माहिती दिली. आगीची माहिती मिळताच मुक्तार मन्सुरी यांच्यासह त्यांचा मित्रपरिवार घटनास्थळी तात्काळ पोहोचले. यावेळी आग विझविण्यासाठी संबंधितानी सटाणा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला अनेकवेळा फोन केले, मात्र पालिकेच्या कार्यालयात कोणीही फोन उचलत नव्हते. तब्बल अर्ध्या तासांनी अग्निशमन बंबाचा चालक आल्याने अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचला. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. 
अग्निशमन विभागाने ३ फेऱ्या मारूनही आग आटोक्यात येत नसल्याने मालेगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. मालेगाव अग्निशमन विभागाच्या अग्निशमन बंबाचा पाईप लिकेज असल्याने पूर्ण दाबाने पाणी आगीवर पडत नसल्याने आग विझवली जात नव्हती. फाटलेले पाईप, मोठमोठे लिकेज असलेला बंब आणि आपत्कालीन परिस्थितीत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक असलेला प्रशिक्षणाचा अभाव यामुळे दोन्ही अग्निशमन विभागाची कामगिरी फक्त सायरन वाजण्यापुरतीच मर्यादित असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. नगरसेवक मुन्ना शेख, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष अनिल पाकळे, भाजपचे निलेश पाकळे यांनी धाडसाने दुकानात प्रवेश करून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, घटनेचे वृत्त समजताच सटाणा पालिकेचे नगराध्यक्ष सुनील मोरे, गटनेते संदीप सोनवणे देखील घटनास्थळी भेट दिली. 

Web Title: Marathi news satana fire in shop