राजेंद्र जाधव यांच्या कार्याला अक्षय कुमारची सलामी 

रोशन खैरनार
गुरुवार, 18 जानेवारी 2018

सटाणा (नाशिक) : प्रदूषणविरहीत, सुरक्षित असलेले आणि कमी खर्चाचे 'ब्लोअर स्प्रेयर' हे कीटकनाशक फवारणी यंत्र बनवणाऱ्या येथील राजू इंजिनिअरींग व सी. के.फर्म्सचे संचालक राजेंद्र छबुलाल जाधव यांच्या संशोधक कार्याची दखल जगाने घेतली आहे. आघाडीचा अभिनेता अक्षय कुमारनेही त्यांच्या या संकल्पनेला सलाम केला असून जाधव यांच्यासह देशभरातील 16 नवप्रवर्तकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे पारितोषिक देखील जाहीर केले आहे. 

सटाणा (नाशिक) : प्रदूषणविरहीत, सुरक्षित असलेले आणि कमी खर्चाचे 'ब्लोअर स्प्रेयर' हे कीटकनाशक फवारणी यंत्र बनवणाऱ्या येथील राजू इंजिनिअरींग व सी. के.फर्म्सचे संचालक राजेंद्र छबुलाल जाधव यांच्या संशोधक कार्याची दखल जगाने घेतली आहे. आघाडीचा अभिनेता अक्षय कुमारनेही त्यांच्या या संकल्पनेला सलाम केला असून जाधव यांच्यासह देशभरातील 16 नवप्रवर्तकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे पारितोषिक देखील जाहीर केले आहे. 

मुंबई येथे आयोजित आगामी 'पॅडमॅन' सिनेमाच्या 'साले सपने' या गाण्याच्या प्रमोशन कार्यक्रमात अक्षय कुमारने ही घोषणा केली. अक्षयच्या भेटीमुळे एक नवी प्रेरणा मिळाल्याचे राजेंद्र जाधव यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

30 वर्षांपूर्वी शहरात छोट्याशा वर्कशॉपमध्ये राजेंद्र जाधव यांनी आपल्या फर्मची सुरुवात केली होती. शेती उपयुक्त विविध अवजारे बनवणे व त्यात नवीन प्रयोग करण्याची आवड असलेल्या जाधव यांनी अल्पावधीतच यश मिळविले. विविध प्रकारच्या फळबागा व पालेभाज्यांना कीटकनाशक फवारणीसाठी उपयोगी असलेले कमी खर्चात मिळणारे आधुनिक 'ब्लोअर स्प्रेयर' हे यंत्र संशोधनातून बनविले. केवळ 15 अश्वशक्ती असलेल्या ट्रॅकटरवर चालणारे, डबल फॅन, पिकाच्या लागवडीनुसार ऍडजस्ट करता येणारे नोझलसह पॅनल अशी यंत्राची रचना आहे. 

परदेशी बनावटीच्या यंत्राइतक्या हवेचा प्रेशर देणारे यंत्र जाधव यांनी तयार केले आहे. त्यांच्या या संशोधनाची दखल घेऊन गेल्या वर्षी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दिल्ली येथे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला होता. जाधव यांच्याप्रमाणेच शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांच्या उपस्थितीत आगामी 'पॅडमॅन' सिनेमातील 'साले सपने' या गाण्याचे प्रदर्शन करण्याची इच्छा अक्षय कुमारने व्यक्त केल्याने मुंबई येथील भाईदास ऑडीटोरीअममध्ये 'राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान' या संस्थेतर्फे हा कार्यक्रम पार पडला. देशभरातील 16 व्यक्तींमधून महाराष्ट्रातील जाधव यांच्यासह इंद्रजीत खस (सोयगाव, औरंगाबाद) व सुभाष जगताप (शेंदुर्णी, जळगाव) यांचा समावेश होता. 

अक्षय कुमारने प्रत्येकाच्या नवसंशोधनाची माहिती जाणून घेतली व प्रत्येकाचा सत्कार करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे पारितोषिकही जाहीर केले. यावेळी अभिनेत्री सोनम कपूर, दिग्दर्शक आर.बाल्की, राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानचे संचालक बिपीन कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

अक्षयकुमार हा एक हरहुन्नरी, नवीन प्रयोग करून सामाजिक बांधिलकी जपणारा कलावंत आहे. सैन्यदलातील जवानांबद्दल त्याची असलेली भावना सर्वश्रुत आहे. पाच लाख रुपयांच्या मदतीपेक्षा अशा व्यक्तीकडून झालेला सन्मान व आमच्या संशोधनाची माहिती काळजीपूर्वक ऐकून घेण्याची वृत्ती आम्हाला नवे संशोधन करण्यासाठी प्रेरणा देणारी ठरली आहे, असे राजेंद्र जाधव यांनी सांगितले. 

असे कार्य करते 'ब्लोअर स्प्रेयर' यंत्र...
'ब्लोअर स्प्रेयर' यंत्र चालविण्यासाठी कमीतकमी 15 अश्वशक्ती असलेल्या ट्रॅक्टरची आवश्यकता आहे. या यंत्रासाठी डीझेलही अत्यंत कमी लागते. झाडाची लागवड उंचीनुसार पॅनल व नोझल झाडाकडे सेट करता येतात. तसेच फवारणी करताना दोन फॅन अतिउच्च दाबाची हवा निर्माण करतात. ज्यामुळे कमी औषधात अधिकाधिक परिणाम मिळतो. या यंत्राद्वारे शेतकऱ्याच्या औषधाची बचत होऊन प्रदूषणही होत नाही. एकच यंत्र अनेक प्रकारच्या फळबागा व भाजीपाला फवारणीसाठी उपयुक्त ठरते.
 

Web Title: Marathi news satana news akshay kumar