सटाणा महाविद्यालयात तिसरा पदवीग्रहण समारंभ संपन्न

रोशन खैरनार
मंगळवार, 6 मार्च 2018

सटाणा : विद्यापीठाची पदवी ही आपल्या ज्ञानाचं प्रतिक म्हणून मिळालेली असते. या प्रतीकाला सार्थ करणे ही आपली जबाबदारी असल्याने विद्यार्थ्यांनी पदवीच्या ज्ञानाचा उपयोग समाज व देशासाठी करावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी काल सोमवारी (ता. ५) येथे केले. 

येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तिसऱ्या पदवीग्रहण समारंभात दीक्षांत भाषण करताना डॉ. कोतापल्ले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे तर प्रमख पाहुणे म्हणून संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, उपसभापती राघोनाना अहिरे, तालुका संचालक डॉ.प्रशांत देवरे, मनोहर देवरे, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, प्राचार्य डॉ. एस.जी.बाविस्कर आदी उपस्थित होते. पदवी मिळविल्यानंतर विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता आपल्या ज्ञानाचा उपयोग उद्योगधंद्यात करावा आणि देशाच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. कोतापल्ले यांनी केले. 

यावेळी बोलताना श्रीमती पवार म्हणाल्या, पदवी मिळाल्यानंतर पदवीधारकाची जबाबदारी वाढते. त्यामुळे पदवीधारकाने आपली जबाबदारी ओळखून पदवीला योग्य न्याय द्यावा. पदवी बरोबरच आपल्या जीवनात प्रामाणिकपणा, समर्पण आणि त्याग या गोष्टींचा अंगीकार करावा. अध्यक्षीय भाषणात डॉ. शेवाळे यांनी पदवी प्राप्त करणे हा विद्यार्थ्यांच्या जीवनातल महत्वाचा क्षण असल्याने आयुष्यभर त्यांनी हा दिवस प्रेरणादिन म्हणून जपावा व जीवन घडवावे असे सांगितले. 

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिक्षणशास्त्र महाविद्यालय तसेच सटाणा, ताहाराबाद, सोयगाव (मालेगाव), नांदगाव, मनमाड आदी महाविद्यालयातील २३० विद्यार्थांना पदवी प्रदान करण्यात आली. प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रा.प्रिया आंबेकर यांनी सुत्रसंचालन केले तर ताहाराबाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.एल.साळी यांनी आभार मानले. 
 
Web Title: Marathi news satana news convocation of satana mahavidyalay