सटाणा - पुणे वातानुकूलित 'शिवशाही' आजपासून सुरु

Shivshahi
Shivshahi

सटाणा : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातर्फे प्रवाशांच्या सोईसाठी सटाणा - पुणे वातानुकूलित 'शिवशाही' एस.टी.बससेवा आज सोमवार (ता.५) पासून सुरु करण्यात आली आहे. दररोज सकाळी व रात्री येथील आगारातून सुटणाऱ्या या बससाठी कमी भाडे आकारले जाणार असून शहर व तालुक्यातील शेकडो विद्यार्थी व प्रवाशांना या आरामदायी बससेवेचा मोठा फायदा होणार आहे. 

आज सकाळी 11 वाजता येथील बसस्थानकात नगराध्यक्ष सुनील मोरे, एस. टी. महामंडळाच्या नाशिक विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांच्या हस्ते वातानुकूलित 'शिवशाही' बससेवेचा प्रारंभ करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक राहुल पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख डॉ.प्रशांत सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, दत्तू बैताडे, एस. टी. कर्मचारी संघटनेचे रमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

शहर व तालुक्यातील अनेक विद्यार्थी पुणे येथे शिक्षण घेत असतात. नोकरी व व्यवसायानिमित्त तालुक्यातील हजारो नागरिक पुण्यात स्थायिक झाले आहेत. तसेच अनेक प्रवाशांना कामकाजानिमित्त पुणे येथे ये - जा करावी लागते. मात्र पुरेशा बसेस अभावी त्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रशासनाने सटाणा - पुणे आरामदायी बससेवा सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. ही मागणी पूर्ण झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. अधिकाधिक प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी केले.

४३ प्रवाशांची क्षमता असलेल्या या या वातानुकुलीत बसमध्ये टू बाय टू आसनव्यवस्था असून आकर्षक डिजिटल बोर्ड, मोबाइल चार्जर, सीसीटीव्ही, अनाउन्समेन्ट सिस्टिम अशा विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. सटाणा आगारातून दररोज सकाळी 11 आणि रात्री 9 वाजता तर शिवाजीनगर पुणे येथून सकाळी 8.15 तर रात्री 11.30 वाजता ही बस सुटणार आहे.

कार्यक्रमास आगार व्यवस्थापक उमेश बिरारी, आर. डी. जगताप,  प्रकाश महाजन, एस. आर. कांबळे, सुभाष नंदन, शरद शेवाळे, मुन्ना सोनवणे, राजनसिंग चौधरी, मंगलसिंग जोहरी, युवा सेनेचे सचिन सोनवणे, अमोल पवार, शेखर परदेशी, डॉ.मच्छिंद्र बर्डे, पप्पु शेवाळे, सागर पगार, महेश सोनवणे आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते, आगाराचे अधिकारी, कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते. 

येथील आगारातर्फे सटाणा ते मुंबई ही बससेवा गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आली आहे. शहर व तालुक्यातील व्यापारी, विद्यार्थी व प्रवाशांनी अनेकवेळा मागणी करूनही आगार प्रशासन ही बससेवा सुरु करण्यास नेहमीच टाळाटाळ करते. पूर्वी सकाळी 9.30 तर रात्री 9 वाजता ही बस मुंबईसाठी सुटत असल्याने तालुक्यातील शेकडो व्यापारी, विद्यार्थी व प्रवाशांना मुंबईकडे जाणे सोईचे होते. मात्र पुरेशा प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याचे कारण पुढे करून प्रशासनाने ही बससेवा अचानक बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. नंदुरबार, साक्री, अक्कलकुवा या आगारातून दररोज मुंबईकडे जाणाऱ्या बसेसमध्ये सटाणा येथून अनेक प्रवासी ये - जा करतात. संबंधित आगारातून आधीच खच्चून भरलेल्या बसमध्ये सटाणा येथील प्रवाशांना नाशिक व मुंबईपर्यंत नाईलाजाने उभे राहून प्रवास करावा लागतो. या बसेसला चांगले उत्पन्न मिळत असताना सटाणा आगाराला ही बससेवा सुरु करण्यास अडचण काय, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवासी उपस्थित करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com