रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाणतर्फे 'महिला दिना' निमित्त व्याख्यान

रोशन खैरनार
शुक्रवार, 9 मार्च 2018

सटाणा : एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. प्रत्येक महिलेने जीवनात सकारात्मक विचार केला तर समाजात त्या आपल्या कर्तुत्वाची मोहर सहज उमटवू शकतात. त्यामुळे महिलांनी आपले अस्तित्व व कर्तुत्व सिद्ध करून देशाच्या प्रगतीस हातभार लावावा, असे आवाहन नाशिक रोटरी क्लबच्या सचिव व प्रसिद्ध उद्योजिका नेहा खरे यांनी आज शुक्रवार (ता.९) रोजी केले.

सटाणा : एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. प्रत्येक महिलेने जीवनात सकारात्मक विचार केला तर समाजात त्या आपल्या कर्तुत्वाची मोहर सहज उमटवू शकतात. त्यामुळे महिलांनी आपले अस्तित्व व कर्तुत्व सिद्ध करून देशाच्या प्रगतीस हातभार लावावा, असे आवाहन नाशिक रोटरी क्लबच्या सचिव व प्रसिद्ध उद्योजिका नेहा खरे यांनी आज शुक्रवार (ता.९) रोजी केले.

येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाणतर्फे 'जागतिक महिला दिना' निमित्त 'उद्योजकता विकास आणि महिला सक्षमीकरण' या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख व्याख्याता म्हणून श्रीमती खरे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे उपप्रांतपाल डॉ.वसंतराव आहेर, माजी उपप्रांतपाल डॉ.प्रकाश जगताप, रोटरीचे अध्यक्ष डॉ.उमेश बिरारी, सचिव प्रदीप बच्छाव, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.धोंडगे म्हणाले, भारताला मोठी प्रगती साधण्यासाठी महिला सक्षमीकरण अत्यावश्यक आहे. महिला सक्षमीकरणासाठी समाज, देश आणि महिलांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे. हे प्रयत्न केवळ समाजातील काही महिलांपुरतेच आणि शहरी भागात सीमित न राहता ते समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचेही डॉ.धोंडगे यांनी स्पष्ट केले. डॉ.उमेश बिरारी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

रोटरॅक्ट वृषाली गांगुर्डे यांच्या हस्ते नेहा खरे यांना रोटरी बागलाणतर्फे 'स्त्री गौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयातील प्राध्यापिकांचाही सन्मान करून नूतन रोटरॅक्ट सदस्यांना पीन प्रदान करण्यात आली. महाविद्यालयाच्या आवारात रोटरी क्लबच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमास प्रा.प्रिया आंबेकर, प्रा.कल्पना पाटील, प्रा.तृप्ती काकुळते, प्रा,जयश्री कदम, प्रा.पल्लवी खैरनार, प्रा.एस.व्ही.घरटे, प्रा.बी.के.पाटील, मनोज जाधव, रामदास पाटील, उमेश सोनी, नितीन मगर, योगेश अहिरे, प्रा.राजेंद्र वसईत, प्रा.एम.डी.सोनवणे, प्रा.एस.बी.शेवाळे, प्रा.जे.जे.पगार, प्रा.एम.ए.पाटील, एस.बी.शिंदे, प्रा.ए.आर.निकम आदींसह प्राध्यापिका व विद्यार्थिनी उपस्थित होते. शशिकांत कापडणीस यांनी सूत्रसंचालन केले तर सचिव प्रदीप बच्छाव यांनी आभार मानले.
 

Web Title: Marathi news satana news womens day