नामशेष गावरान वाण विकसित करण्यासाठी अनोखा "सातपुडा ब्रॅन्ड' 

आनंद बोरा
शनिवार, 29 जून 2019

नाशिक ः नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगेत आदिवासी बांधवांकडून शेकडो वर्षांपासून घेण्यात येणाऱ्या गावरान मका व ज्वारी या धान्याचे गावरान वाण विकसित करण्यात येथील शेतकऱ्यांना यश आले. गेली दहा वर्षे मेहनत घेऊन आज या भागातील "सातपुडा ब्रॅन्ड' देशभरात प्रसिद्ध झाला आहे. मक्‍याच्या 28 व ज्वारीच्या 24 जाती विकसित करण्यात यश लाभल्याचे आदिवासी शेतकरी व संशोधक सुभाष पावरा यांनी सांगितले. 

नाशिक ः नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगेत आदिवासी बांधवांकडून शेकडो वर्षांपासून घेण्यात येणाऱ्या गावरान मका व ज्वारी या धान्याचे गावरान वाण विकसित करण्यात येथील शेतकऱ्यांना यश आले. गेली दहा वर्षे मेहनत घेऊन आज या भागातील "सातपुडा ब्रॅन्ड' देशभरात प्रसिद्ध झाला आहे. मक्‍याच्या 28 व ज्वारीच्या 24 जाती विकसित करण्यात यश लाभल्याचे आदिवासी शेतकरी व संशोधक सुभाष पावरा यांनी सांगितले. 

दहावीपर्यंत शिक्षण झालेले साठवर्षीय सुभाष पावरा यांची सातपुडा रांगेतील पाच व सहा पुड्यामध्ये हरणखुरा गावात शेती आहे. पारंपरिक पद्धतीने ते मका व ज्वारीचे पीक घेतात. त्यांना जव्हारचे संजय पाटील यांनी गावरान वाणाविषयी माहिती देऊन त्याच्यावर संशोधन करण्यास सांगितले. श्री. पावरा यांनी आजूबाजूच्या दहा शेतकरी मित्रांच्या सहाय्याने हे काम सुरू केले. विविध ठिकाणी जागेची निवड करून गट तयार केले. शंभर-शंभर दाणे देऊन त्याचे संशोधन केले. यासाठी बायफ संस्थेने त्यांना प्रशिक्षण दिले. आता या शेतकऱ्यांनी हे बियाणे विक्रीसाठी आणले आहे.

या वाणाला देशभरातून प्रचंड मागणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. या गावरान वाणाला रोपसंवर्धन शेतकरी अधिकार प्राधिकरण अर्थात, पीपीव्ही एफआरएने मान्यता दिली आहे सातपुड्यामधील धडगाव व अक्कलकुवा तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता पाहावयास मिळते. विशेष म्हणजे, पिकांमध्ये त्यांचे प्रमाण मोठे होते. या वाणांचे संवर्धन व जतन करण्यासाठी या परिसरात संशोधन सुरू झाले. यासाठी हरणखुरा गावात आबा कुंबी बियाणे संवर्धन समिती स्थापण्यात आली. या वाणाला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. त्याची दखल घेत प्रोटेक्‍शन ऑफ प्लांट व्हरायटी ऍन्ड फार्मर राइट ऍथॉरिटी या संस्थेने दहा शेतकऱ्यांना या संशोधनाबद्दल दहा लाख रुपये रोख व नेशन झेन्स ऍवॉर्ड देऊन सन्मानित केले. 

या शेतकऱ्यांकडून संशोधन 
सुभाष बुरड्या पावरा, मोसडा भामटा पावरा, बावा खजाव पावरा, जोरदार बुरड्या पावरा, नाना इसमल पावरा, गुजऱ्या देहल्या पावरा, मोहन टेंबऱ्या पावरा, जयसिंग नारया पावरा, देहल्या जंगल्या पावरा, सरदार जंगल्या पावरा. 

विकसित केलेले प्रमुख गावरान वाण 
मका ः एम-13, एम-18, एम-03, एम-22 व एम-01 मक्‍याचे हे पाच वाण विकसित केले आहेत. कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे हे वाण आहेत. 
ज्वारी ः एस-09, एस-05, एस-13, एस-19, एस-02 हे वाण कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे आहेत. हे पीक साधारण 15 ते 16 फूट वाढते. त्यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध होतो. 

देशातील अनेक शेतकरी आमच्या संपर्कात आहेत. राहुरी कृषी विद्यापीठाने आमच्या कामाचे कौतुक केले असून, बायफ संस्थेने प्रशिक्षण दिले आहे. आरोग्यासाठी उत्तम असणारे हे वाण असून, या पिकांना मोठ्या हॉटेलमधून मागणी येत आहे 
- सुभाष बुरड्या पावरा, संशोधन करणारे शेतकरी, 
हरणखुरी, सातपुडा 
 

आम्ही 30 विद्यार्थी कृषी महाविद्यालयातील असून, ग्रामीण कृषी कार्यानुभवांतर्गत अभ्यास करत आहोत. गेले पंधरा दिवस आम्ही येथील शेतकऱ्यांना भेटून या वाणाविषयी माहिती घेऊन नवीन शेतकऱ्यांना अशी पिके घेण्यासाठी जनजागृती करत आहोत. 
- सागर निकुंभ, विद्यार्थी, कृषी महाविद्यालय, नंदुरबार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news SATPUDA BRAND