स्वच्छतेसाठी शाळांमध्ये "स्वच्छता दूत' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

नाशिक : शहरातील स्वच्छतेची शाळांकडून अपेक्षा नाही. मात्र शहरात कचरा होऊ नये म्हणून जागृक नागरिक शाळांमधून घडावेत, अशी अपेक्षा आहे. तसेच कृतीयुक्‍त शिक्षण ही काळाची गरज असून स्वच्छतेची सवय विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी महापालिका व खासगी शाळांमध्ये स्वच्छता दूत (क्‍लिनलीनेस सोल्जर) उपक्रम राबविण्यात येईल. महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही घोषणा आज केली. 

नाशिक : शहरातील स्वच्छतेची शाळांकडून अपेक्षा नाही. मात्र शहरात कचरा होऊ नये म्हणून जागृक नागरिक शाळांमधून घडावेत, अशी अपेक्षा आहे. तसेच कृतीयुक्‍त शिक्षण ही काळाची गरज असून स्वच्छतेची सवय विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी महापालिका व खासगी शाळांमध्ये स्वच्छता दूत (क्‍लिनलीनेस सोल्जर) उपक्रम राबविण्यात येईल. महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही घोषणा आज केली. 

महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराचे स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेल्या नुतनीकरणानंतर पहिल्यांदाच आयुक्तांनी खासगी संस्थाचालक, मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांची बैठक घेतली. ते म्हणाले, की शिक्षणात सर्वात महत्वाचा घटक विद्यार्थी आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करण्याऐवजी अन्य विषयांना महत्व दिले जाते. मुळातच, शिक्षण दुधारी शस्त्रासारखे असून नाशिकच्या क्षमतांचा वापर व्हावा, अशी अपेक्षा आहे. 

असा असेल स्वच्छता दूत उपक्रम 
उपक्रमांतर्गत सर्व शाळांना शालेय आवारात, प्रत्येक मजल्यावर हिरवे, निळे व लाल रंगाची कचरा पेटी (डस्टबिन) ठेवावा लागेल. कृतीयुक्‍त शिक्षणानुसार विद्यार्थ्यांना वर्गवारीनुसार कुठल्या रंगाच्या पेटीत कचरा टाकायचा याचे कृतीशील शिक्षण शिक्षकांनी द्यायचे आहे. उपक्रम राबविण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांची असेल. विद्यार्थ्यांमधून प्रतिनिधी अर्थात "कॅप्टन'ची निवड केली जाईल. शाळांकडून विविध संकल्पनांवर आधारित उपक्रम राबवावेत. विद्यार्थी शाळेतील उपक्रमात सहभागी होताना आपल्या सोसायटीत देखील यासंदर्भात जनजागृती करेल. सोसायटीतील सदस्यांसह गृहकाम करणाऱ्या कामगारांमध्ये जागृकता निर्माण करण्याचे धेय्य असेल. 

ऑनलाईन अहवाल 
शाळांनी राबविलेल्या उपक्रमाचा साप्ताहिक अहवाल ऑनलाईन स्वरूपात महापालिकेला कळविणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा महापालिकेतर्फे "ऑटो शो-कॉज' बजावले जाईल. महापालिकेच्या घनकचरा पुनर्प्रक्रिया, वीजनिर्मिती प्रकल्पांना दुसऱ्या, चौथ्या शनिवारी विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करायचे आहे. 

तंबाखूमुक्‍त प्रांगणाची जबाबदारी 
शालेय परिसरात शंभर मीटर अंतरावर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे गुन्हा आहे. तरी अशा पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनात आल्यास याबाबत शैक्षणिक संस्थांना जबाबदार धरले जाईल. जर तंबाखुजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास प्रशासन, पोलिसांना कळवावे, असेही श्री. मुंढे यांनी सांगितले. 

महापालिका शिक्षकांची शिकवणी 
इमारत, शिक्षकांची कमतरता, कामाचा ताण आदी प्रश्‍न महापालिका शाळांच्या गुणवत्तेसाठी कारणीभूत ठरू शकत नाहीत. महापालिका शाळातील दर्जा वाढविण्यासाठी शिक्षकांनी दृष्टीकोन बदलण्याची आवश्‍यकता असल्याचे श्री. मुंढे म्हणाले. दुसऱ्या सत्रात महापालिका शिक्षकांची आयुक्‍तांनी शिकवणी घेतली. 
 

Web Title: MARATHI NEWS SCHOOL SWACHAYTA DOOT