भाजपमधील गट-तट ठरू नये डोकेदुखी! 

भाजपमधील गट-तट ठरू नये डोकेदुखी! 

शहादा- तळोदा मतदारसंघात भाजपला सुरवातीला सहज वाटणारा विजय पक्षातर्गत गटबाजीमुळे पराभवाच्या दिशेने सरकत असताना सर्वांचा समन्वय साधत भाजपच्या नवख्या उमेदवाराने काँग्रेसच्या अनुभवी उमेदवाराला पराभूत केले. एकंदरीत गट-तट असतानाही शहादा मतदारसंघात भाजपचे नवीन पर्व सुरू झाले आहे. यापुढील काळात हे गट-तट असेच राहिले तर पक्षासाठी ते त्रासदायक ठरू शकते... 

शहादा- तळोदा मतदारसंघ दोन तालुक्यांत विभागला गेला आहे. त्यामुळे प्रचार करताना उमेदवाराची मोठीच दमछाक होते. त्यातच प्रचाराला सर्वच उमेदवारांना अल्पसा कालावधी मिळाला होता. भाजप- शिवसेना-आरपीआय व मित्रपक्षांतर्फे उमेदवारी केलेले राजेश पाडवी हे नवखे होते, मात्र अनुभवीही होते. प्रचारादरम्यान मतदारसंघातील काही जनतेने त्यांना पाहिलेही नव्हते, तर काहींना पाहण्याची उत्सुकता होती. काँग्रेसचे उमेदवार पद्माकर वळवी हे सर्वांचे परिचित व माजी मंत्री होते. जयसिंग माळी यांनाही मानणारा वर्ग, तर अपक्ष उमेदवार झेलसिंग पावरा यांचीही नोकरीनिमित्ताने काहींशी नाळ जुळली होती. या चौरंगी लढतीत विजयाची माळ आपल्या गळ्यात पाडण्यात राजेश पाडवी यशस्वी ठरले. 

शहादा तालुक्याने तारले... 
या विधानसभा निवडणुकीची जागा मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली होती. उमेदवार राजेश पाडवी यांना नोकरीचा राजीनामा देऊन थेट निवडणुकीत उतरविले होते. त्यांच्या विजयासाठी वरिष्ठ नेत्यांच्या सभा झाल्या; त्याचबरोबर तालुक्यातील दिग्गज नेत्यांचे तिन्ही गट एकत्र आणण्यासाठी साऱ्यांनीच परिश्रम घेतले. प्रतिस्पर्धी उमेदवार वळवी यांच्या गेल्या निवडणुकीत निसटता पराभव झाला होता. त्यामुळे या निवडणुकीत ते जोमाने कामाला लागले होते. जिल्ह्यात काँग्रेस खिळखिळी झाल्याने त्याचा त्यांना तोटा झाला. गेल्या वेळेपेक्षा या निवडणुकीत त्यांना मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. शहादा तालुक्यातून भाजपला पाच हजारांहून अधिक मताधिक्य मिळाल्याने श्री. पाडवी यांची विजयाची घोडदौड कायम राहिली. 

भाजपमध्ये एकसंधपणा येईल का? 
भाजपमध्ये सुरवातीला उमेदवारीवरून त्रांगडे झाले होते. निष्ठावान अन् उपरे असा वाद गेले काही दिवस होता. कार्यकर्त्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव तद्‍नंतर प्रचारादरम्यान असलेले गट-तट विजय मिरवणुकीतही कायम असल्याचे शहरवासीयांनी पाहिले. त्यामुळे यापुढे भाजपमध्ये एकसंधपणा येईल का? एक संघटना आल्याशिवाय विकासाचा रथ पुढे धावणार नाही. त्यासाठी वरिष्ठांना खूपच लक्ष घालावे लागणार आहे. 

वेगवेगळ्या गटांच्या मिरवणुका 
भाजपचे राजेश पाडवी विजयी झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी निवडणूक कार्यालयात आले, त्यावेळी सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जयपालसिंह रावल, अभिजित पाटील, विश्वनाथ कलाल, प्रा. मकरंद पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रमाणपत्र मिळण्यास उशीर असल्याने सर्व नेते शहरातील महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यास कार्यकर्त्यांसह ढोल- ताशांच्या गजरात निघाले. या रॅलीतच तीन वेगवेगळ्या गटांच्या मिरवणुका होत्या. यात अभिजित पाटील यांच्या गटाची, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र जमदाळे यांच्या गटाची, तर महामानवाला अभिवादनानंतर जयपालसिंह रावल यांच्या कार्यकर्त्यांनी वेगळी मिरवणूक काढली. त्यामुळे भाजप विजयी झाला असला, तरी अंतर्गत गटांचा वाद कधीही उफाळून येण्याची चिन्हे आहेत. या सर्व गटांना एकत्रित आणून समन्वयातून सांभाळावे लागण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे. शहरात मात्र या वेगवेगळ्या गटांच्या रॅलीमुळे वेगळीच चर्चा सुरू होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com