शहाद्याच्या या महाविद्यालयाची 'स्टार कॉलेज स्कीम'मध्ये निवड 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

या अनुदानातून महाविद्यालयातील विद्यार्थी-प्राध्यापकांना प्रात्यक्षिक, संशोधन, उन्हाळी प्रशिक्षणासाठी सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच प्राध्यापकांच्या गुणवत्तेसह कौशल्य विकास वाढीसाठी महाविद्यालयाचा 'स्टार कॉलेज स्कीम ' मधील समावेश लाभदायक ठरणार आहे. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. सैय्यद यांची संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ​

शहादा :  केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाची 'स्टार कॉलेज स्कीम'मध्ये निवड केली आहे. विज्ञान विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांच्या प्रात्यक्षिक, संशोधनात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर व्हावा यासाठी स्किमअंतर्गत येत्या तीन शैक्षणिक वर्षात सुमारे ९० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे. या स्कीममध्ये यावर्षी समावेश करण्यात आलेले शहादा महाविद्यालय हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव ठरले आहे. 
शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्टता गाठण्यासाठी केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध असलेल्या महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागवले जातात. या विज्ञान विभागातील विद्यार्थी - प्राध्यापकांना प्रात्यक्षिक व सैद्धांतिक अध्ययनात गुणवत्ता विकासासाठी प्रयोगशाळा उपलब्ध आहे. अधिक सुविधांसाठी योजनेत समावेशाबाबत प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. 

या योजनेसाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, अर्थ व बांधकाम समन्वयक पी. आर. पाटील व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील व सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. झेड. सैय्यद यांनी प्रस्ताव सादर केला होता. केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या पॅनलसमोर या प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यानुसार महाविद्यालयातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र प्राणिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विषयाच्या शैक्षणिक व भौतिक सुविधा वाढीसाठी येत्या तीन शैक्षणिक वर्षांसाठी अठरा लाख रूपये प्रती विषयाप्रमाणे पाच विषयांसाठी ९० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे. 

 
आता स्टार कॉलेज स्टेटस 
वरिष्ठ महाविद्यालयाला यापूर्वीच नॅकतर्फे 'ए' ग्रेड मिळाला असून कॉलेज विथ पोटेन्शियल एक्सलन्स स्किम अंतर्गत यूजीसीकडून यापूर्वी एक कोटी तर बेसिक सायंटिफिक रिसर्च योजनेत ४५ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. केंद्र सरकारच्या 'स्टार कॉलेज स्कीम ' योजनेतील समावेशामुळे महाविद्यालयाला 'स्टार कॉलेज स्टेटस' प्राप्त झाले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. पाटील यांनी दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada collage selection star collage scheme