शहादा आगारातील वाहकाचा कोरोनाने मृत्यू ;मुंबईत सेवा बजावता लागण

कमलेश पटेल
Wednesday, 2 December 2020

आठ दिवस सेवा दिल्यानंतर शहादा येथे परत आल्यावर त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. त्यांच्या अहवाल पॉझिटिव्‍ह आल्याने त्यांना नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले.

शहादा : मुंबई येथून कर्तव्य बजावून आलेल्या शहादा आगारातील एका ५२ वर्षीय कोरोनाबाधित वाहकाचा सोमवारी (ता. २०) मृत्यू झाला. आधीच अनेक विकारांनी त्रस्‍त असताना जबरदस्तीने मुंबई येथे सेवा बजाविण्यासाठी पाठविल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

वाचा- खडतर आव्हाने पार करीत रेणुकाने स्वप्न साकारले; आणि बीएसएफमध्ये खानदेशातील पहिली तरुणी म्हणून झाली भरती !

कोरोनाचे संक्रमण वाढू नये, म्हणून मुंबईतील लोकलसेवा बंद होती. बेस्टच्या बसमधून प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विविध आगारातून कर्मचारी मुंबईला सेवा बजावण्यासाठी जात आहेत. येथील आगारातून वाहक व चालकांना मुंबईला आठ ते दहा दिवसांसाठी सेवा बजावण्यासाठी पाठविण्यात आले. यात कर्मचाऱ्यांचे काहीच न ऐकता, विविध आजारांनी त्रस्त असलेले व ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांबद्दल मोठी नाराजी आहे. 

शहादा आगारातील वाहक यशवंत तुकाराम सोनवणे (वय ५२) २८ वर्षापासून शहादा आगारात सेवा देत होते. अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १४ नोव्हेंबरला मुंबईला बेस्टची बससेवा देण्यासाठी गेले होते. आठ दिवस सेवा दिल्यानंतर शहादा येथे परत आल्यावर त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. त्यांच्या अहवाल पॉझिटिव्‍ह आल्याने त्यांना नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णवाहिकेने नाशिकला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. कोरोना नियमानुसार नाशिकलाच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

आवश्य वाचा- भाजपला त्यांचे आमदार सांभाळण्यासाठी ‘सरकार पडणार’ असे म्हणावे लागतेय- एकनाथ खडसे 

अधिकाऱ्याची चौकशीची मागणी 
मृत यशवंत सोनवणे यांना आधीच हृदयविकाराचा त्रास होता. त्यांची ऍन्जिओग्राफीही झाली होती. वय ५२ असल्यामुळे मुंबईला न पाठवता येथेच ड्यूटी लावण्याची विनंती त्यांनी केली होती, असे समजते. मात्र, अधिकाऱ्यांनी काही न ऐकता यशवंत सोनवणे यांना मुंबईला पाठवले. त्यांना तेथे कोरोनाची लागण झाली. मुंबईला जाण्यास तयार नसताना जबरदस्तीने पाठविण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मुंबई येथे पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सोनवणे यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada coroner kills ST carrier at shahada depot