बोगस बीटी बियाण्यावर शहादा तालुक्‍यात छापा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

शहादा : कृषी विभागाच्या छाप्यात तालुक्‍यातील कर्जोत येथे बनावट एचटीबीटी कापूस बियाणे आढळून आले असून, या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. म्हसावदनंतर कर्जोत येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे बोगस बियाणे विक्रेत्यांत खळबळ उडाली आहे. 

शहादा : कृषी विभागाच्या छाप्यात तालुक्‍यातील कर्जोत येथे बनावट एचटीबीटी कापूस बियाणे आढळून आले असून, या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. म्हसावदनंतर कर्जोत येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे बोगस बियाणे विक्रेत्यांत खळबळ उडाली आहे. 

नंदुरबार येथील जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरुण श्रीराम तायडे यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर, मोहीम अधिकारी प्रशांत शेंडे, श्री. तायडे, कृषी सहाय्यक मनोज खैरनार, कनिष्ठ सहाय्यक पद्‌माकर पाटील, पोलिस कर्मचारी नीलेश वसावे, गंगा तायडे यांच्यासह सापळा रचला. कर्जोत येथील चुनिलाल श्‍यामभाई पटेल यांच्या जयअंबे निवास येथे या पथकाने छापा टाकला असता त्यांच्या आईने चुनिलाल पटेल हे बाहेरगावी गेल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांसह पंचांसोबत घराची झडती घेतली असता त्यात तीन पोती आरआरबीटी कापूस बियाणे आढळून आले. तिन्ही पोत्यात एकूण 132.69 किलोग्रॅम बियाणे आढळून आले. 

हे बियाणे बिजप्रक्रिया केलेले असून, राज्यात परवानगी नसलेले व गुजरात राज्यातील तणनाशक बीटी बियाणे विक्रीच्या उद्देशाने साठवणूक करून ठेवल्याच्या कारणावरून चुनिलाल पटेल यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात रात्री 
उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्‍यातील म्हसावदनंतर कर्जोत येथे बनावट कापूस बियाणे विक्री प्रकरणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून मुद्देमालासह गुन्हा दाखल केल्याने बनावट बियाणे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

किराणा दुकानांतूनही विक्री पावसाळ्यापूर्वी हंगामात दरवर्षी तालुक्‍यातील वडाळी, बामखेडा, मंदाणे, असलोद, सारंगखेडा, म्हसावद, प्रकाशा आदी गावांत मोठ्या प्रमाणात बियाण्यांची विक्री केली जाते. कृषी निविष्ठा केंद्रास शासनाची मान्यता असणे बंधनकारक असताना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात किराणा किंवा अन्य दुकानांवर बि-बियाणे व खतांची विक्री होते. यातून बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. ही फसवणूक टाळावी, यासाठी जिल्हा कृषी विभागाने हंगामापूर्वीच कारवाई सुरू केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Web Title: marathi news shahada cottone bt seeds