दिलासादायक निर्णय...शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यत 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

तालुका कृषी विभाग, नगरपालिका व भूमिपुत्र शेतकरी गटाने पुढाकार घेऊन नागरिकांना लॉक डाऊन काळात थेट भाजीपाला घरपोच मिळत आहे. शेतकरी व ग्राहक दोन्हींचा फायदा असून ताजा भाजीपाला ग्राहकांना मिळणार आहे. 
-अभिजित पाटील, सभापती कृषी व बांधकाम जिल्हा परिषद नंदुरबार 

 

शहादा  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात तालुक्यातील फळे, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी अडचणी येत आहेत. व्यापारीही मालाची खरेदी करण्यासाठी पुढे येत नाहीत या परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे काम कृषी विभागाकडून नगरपालिका तसेच भूमिपुत्र शेतकरी गटांमार्फत शहरातील वृंदावननगर येथून सुरुवात करण्यात आली आहे. 

 आर्वजून पहा : "त्या'... कोरोना पॉझिटिव्ह ट्रकचालकामुळे जिल्हावासीयांना टेंशन 
 

जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती अभिजित पाटील, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, कृषी मंडळ अधिकारी राहुल धनगर, नगरसेवक संदीप पाटील आदी उपस्थित होते. शहरातील ग्राहकांना मागणीनुसार घरपोच भाजीपाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दोनशे रुपयात तेरा प्रकारचा भाजीपाला देण्यात येत आहे. 

मागणीप्रमाणे पुरवठा 
तालुक्यातील भाजीपाला फळे उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून रितसर वाहतूक परवाना मिळवून देणे, फळे-भाजीपाला मागणीची नोंद घेणे, क्षेत्रिय स्तरावरील अडचणी सोडविणे, वाहतूक आढावा घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांना विक्रीची संधी उपलब्ध करून देणे, तालुका, जिल्हा, नगरपालिका या जिल्ह्याअंतर्गत मागणीसह राज्यातील इतर जिल्ह्यात व इतर राज्यात मागणीप्रमाणे फळे भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी राहुल खेडकर, राकेश निकम, रायमल पावरा, पंकज वळवी मार्गदर्शन करीत आहे. 

नक्की वाचा : लॉकडाउन'ने सिझन खाल्ला; आता ऑनलाइन शॉपिंगनंतर हवी परवानगी 

तालुक्यात कृषी विभागाचा माध्यमातून टरबूज व इतर फळांची विक्री शेतकरी ते ग्राहक थेट करण्यात येत आहे. संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात अशी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, मंडळ स्तरावर मंडळ कृषी अधिकारी, तर गाव स्तरावर कृषी पर्यवेक्षक, कृषी साहाय्यक, आत्मा'चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व कृषी मित्रांचे सहकार्य लाभत आहे. 

क्‍लिक कराः कोरोनाच्या "सायलेंट कॅरिअर'चा धोका ओळखा 
 

सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर करून भाजीपाल्याची विक्री केली जात आहे. भाजीपाला व फळांचा योग्य प्रमाणात पुरवठा होईल याची काळजी घेतली जात आहे. या उपक्रमांमुळे भाजी बाजारात होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. तालुक्यातील विविध गावातील सर्वच भाजीपाला व फळांची विक्री होत आहे. 
किशोर हडपे, तालुका कृषी अधिकारी, शहादा 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada Farmers' vegetables to consumers directly