
शहर व परिसरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांची माहिती पोलिसांना तत्काळ व्हावी, त्याचप्रमाणे अनेक नागरिक घराला कुलूप लावून कामानिमित्त शहराबाहेर जात असतात त्यांची माहिती पोलिसांकडे नसते. परिणामी बंद घर पाहून घरफोड्या झाल्याच्या घटना शहर व परिसरात घडल्या आहेत,
शहादा (नंदुरबार) : शहर व परिसरात घडणाऱ्या घटनांची माहिती पोलिसांना तत्काळ मिळावी तसेच वाढत्या घरफोड्या, चोरीच्या घटना व गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी पोलिस प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत शहादा पोलिस ठाण्यात नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र ९०२२२५१९८१ हा व्हॉट्सॲप क्रमांक सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक तथा शहाद्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक एम. रमेश यांनी केले.
शहर व परिसरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांची माहिती पोलिसांना तत्काळ व्हावी, त्याचप्रमाणे अनेक नागरिक घराला कुलूप लावून कामानिमित्त शहराबाहेर जात असतात त्यांची माहिती पोलिसांकडे नसते. परिणामी बंद घर पाहून घरफोड्या झाल्याच्या घटना शहर व परिसरात घडल्या आहेत, त्यांना रोखण्यासाठी जे नागरिक कामानिमित्त शहराबाहेर जाणार आहेत, अशा नागरिकांनी पोलिस ठाण्याच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपले नाव, मोबाईल नंबर, किती दिवस शहराच्या बाहेर राहणार आहेत, त्याचप्रमाणे कुठल्या तारखेला जाणार असून, परत कुठल्या तारखेला येणार आहे, याबाबतचा तपशील व माहिती पोलिसांच्या माहितीसाठी व्हॉट्सॲप क्रमांकावर द्यावी. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर त्याची पोलिस प्रशासनातर्फे योग्य ती दखल घेऊन त्या कालावधीत रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाला याची माहिती दिली जाणार असून, संबंधित पोलिस कर्मचारी त्या नागरिकांच्या घरी व परिसरात विशेष गस्त घालून लक्ष ठेवणार आहे. यामुळे घरफोडीच्या प्रकरणांना नागरिकांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.
नागरिकांचे सहकार्य अपेक्षित...
शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांची असली तरी पोलिसांच्या मदतीला नागरिकांचे सहकार्य लाभले, तर अनेक गैरप्रकार रोखणे सहज शक्य होणार असल्याने व पोलिस प्रशासनाशी नागरिकांनी खुल्या मनाने संवाद साधावा. पोलिस प्रशासनाने राबविलेल्या उपक्रमास सकारात्मक साथ देऊन सहकार्य करावे, असे आवाहन परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी केले.
गोपनीयता राखली जाणार
शहादा पोलिस ठाण्याच्या ९०२२२५१९८१ व्हॉट्सअॅप क्रमांकावर जे नागरिक माहिती देतील. त्याच्याबाबत गोपनीयता पाळली जाणार आहे. नागरिकांकडून मिळालेल्या माहितीवर पोलिस प्रशासनाकडून त्या त्या भागात आवश्यक ती दखल घेतली जाईल. नागरिकांनी दिलेल्या माहितीचे संकलन रोज सकाळी दहा व रात्री दहाला केले जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार त्या- त्या भागात विशेष पोलिस बंदोबस्त लावला जाईल. या उपक्रमाचा मूळ उद्देश म्हणजे पोलिसांना शहरातील माहिती मिळावी व पोलिसांच्या मदतीला नागरिकांचे सहकार्य मिळावे, हा आहे.
संपादन ः राजेश सोनवणे