फसवणूक झालेल्या शेतकऱ्यास पोलिसांमुळे २६ लाख परत 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

भिवंडी येथील बालाजी एंजाइम केमिकल कार्पोरेशनच्या तिघा संचालकांविरुद्ध शहादा पोलिसांत ६३ लाख रुपयांचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. शहादा पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवीत संशयिताकडून २६ लाख रुपये वसूल केले. 
 

शहादा (नंदुरबार) : बायोझाईन कृषी उत्पादन कंपनीच्या उद्योजकाकडून पपईवर प्रक्रिया केलेले पेपिन्स नावाचे चार टन प्रॉडक्ट घेऊन त्या मालाचे पैसे परत न करता परस्पर विक्री करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत पुन्हा पाच टन माल तयार करण्यास सांगून खरेदी करण्यास नकार देणाऱ्या भिवंडी येथील बालाजी एंजाइम केमिकल कार्पोरेशनच्या तिघा संचालकांविरुद्ध शहादा पोलिसांत ६३ लाख रुपयांचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. शहादा पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवीत संशयिताकडून २६ लाख रुपये वसूल केले. 
येथील उद्योजक किशोर पाटील यांची बायोझाईम नावाने पपईच्या चिकापासून पेपिन्स नावाचे उत्पादन करणारी कंपनी आहे. कंपनीची एस. आय. बायोझाईम वेबसाइट असून, त्या माध्यमातून भिवंडी येथील बालाजी इंझाईम कंपनीच्या श्रीमती पलक केन्या, अभय केन्या, अरुण केन्या यांनी ऑगस्ट २०१९ पासून त्यांच्या मागणीनुसार पेपिन्सची खरेदी करण्यासह वेळोवेळी पैशाची परतफेड करीत होते. त्यामुळे दोन्ही उद्योजकांचा एकमेकांवर विश्वास बसला. जून २०२० ला केण्या बंधूंनी चार टन पेपिन्सची ऑर्डर दिली. तो माल ओस लॉजिस्टिक कंपनीमार्फत पोच केला. त्यानंतर जुलैमध्ये पाच टन पेपिन्सची ऑर्डर त्यांनी दिली. मात्र, पूर्वीचे चार टनाचे ३१ लाख १४ हजार ७६९ रक्कम मिळाल्यानंतरच पुढील माल पुरवठा करणार असल्याचे किशोर पाटील यांनी स्पष्ट केले. त्यानंतर संशयितांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. श्री. पाटील यांची ६३ लाखांची फसवणूक झाली. याबाबत श्री. पाटील यांनी शहादा पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून केन्या बंधूंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. 

पोलिसांनी गाठले भिवंडी 
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक किसनराव पाटील यांच्या सूचनेने सहाय्यक निरीक्षक नीलेश वाघ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने थेट भिवंडी गाठले. तेथून केन्या बंधूंना ताब्यात घेऊन त्यांचाकडून २६ लाख रुपये वसूल केले. ते श्री. पाटील यांना दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada police return 26 lakh to cheated farmer