सुसाट ट्रक विष्णू मंदिरात घुसला आणि मोठा आवाज झाला !

कमलेश पटेल
Saturday, 10 October 2020

लांबोळा गावाजवळ समोरून अवजड वाहन आल्याने चालकाचा ताबा सुटला. सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या विष्णू मंदिरात घुसला अन्‌ मोठा आवाज झाला. ग्रामस्थ भयभीत झाले.

शहादा : लांबोळा (ता. शहादा) गावात रस्त्याच्या बाजूला असलेल्या व नुकत्याच दोन महिन्यापूर्वी नव्याने जीर्णोद्धार करून बांधण्यात आलेल्या विष्णू मंदिरात सुसाट वेगाने येणारा सोळा चाकी ट्रक घुसल्याने मंदिराचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. त्यात चालक गंभीर झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

आवर्जून वाचा- अरेच्चा सोनगीरला चक्क डोंगरच काढला विक्रीला ?  
 

शहादाकडून गुजरात राज्यात सोळा चाकी ट्रक (क्रमांक जी. जे. ०३ बी. डब्ल्यू. २७७७) लोखंड भरून जात असताना शहादा ते लांबोळादरम्यान तीन ठिकाणी ट्रक चालकाने शहादा शहराकडे जाणाऱ्या वाहनचालकांना कट मारला होता. त्यापैकी शहरातील गुजर गल्लीतील वाहनधारकांनी त्याच्या पाठलाग केला. परिणामी त्याने आपला ट्रक सुसाट वेगाने चालवला. लांबोळा गावाजवळ समोरून अवजड वाहन आल्याने चालकाचा ताबा सुटला. सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या विष्णू मंदिरात घुसला अन्‌ मोठा आवाज झाला. ग्रामस्थ भयभीत झाले. ग्रामस्थांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. अपघातात मंदिराचा काही भाग कोसळला. काही दिवसांपूर्वी जुने मंदिर पाडून नवीन बांधकाम करून जीर्णोद्धार करण्यात आला होता. दोन महिन्यापूर्वीच रंगकाम करण्यात आले होते. घटनेत मंदिराच्या सभागृहाचे व ट्रकचा पुढील भाग चक्काचूर झाला. शहादा पोलिसात रात्री उशिरा अपघाताची नोंद करीत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

आवश्य वाचा- अरे व्वा आता 40 टक्क्यांवर मिळणार अभियांत्रिकीला प्रवेश ! 
 

दरम्यान, ग्रामस्थांनी मंदिराचे झालेले नुकसान पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वाहन चालक गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विसरवाडी ते सेंधवा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र ठेकेदाराने ठिकठिकाणी धोक्याचे इशारा देणारे फलक लावलेले नाहीत. कदाचित फलक राहिला असता तर मंदिराचे नुकसान टळले असते. मंदिराचे साधारणतः: दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada speeding truck hit the temple of Vishnu directly