गतवर्षीच्या मदतीची आस; त्‍यात आणखी अतिवृष्‍टी

कमलेश पटेल
Tuesday, 22 September 2020

शहादा तालुक्यात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बहुतांश ठिकाणी पिकांचे व शेत जमिनी चे नुकसान झाले होते. त्यावेळी ७ हजार २६२ हेक्टरवरील पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाल्याचे महसूल व कृषी विभागातर्फे करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्‍यातून समोर आले होते.

शहादा (नंदुरबार) : गेल्या वर्षी जुलै- ऑक्टोंबरमधील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शहादा तालुक्यात ऑगस्ट २०१९ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे ९ हजार ७५९ शेतकऱ्यांचे ७ हजार २६२ हेक्‍टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले असून त्यांना अंदाजीत आठ कोटी रुपयांचा निधी मदतीसाठी अपेक्षित आहे.

हेपण वाचा- ओल्‍या कापसाचे दर निम्‍म्‍यावर; अतिपावसाचा फटका
 

शहादा तालुक्यात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बहुतांश ठिकाणी पिकांचे व शेत जमिनी चे नुकसान झाले होते. त्यावेळी ७ हजार २६२ हेक्टरवरील पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाल्याचे महसूल व कृषी विभागातर्फे करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्‍यातून समोर आले होते. संबंधितांनी त्या वेळेला तो अहवाल जिल्हा पातळीवर पाठविला होता. परंतु मदतनिधीसाठी शेतकऱ्यांना वाट पहावी लागत होती. शासनाने नुकताच शासन निर्णय जाहीर केला. त्यात जुलै ते ऑक्टोबर २०१९ मधील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेतला. त्यानुसार शहादा तालुक्यात बधितांचा मदतीसाठी अंदाजित ८ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

तालुक्यात गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे सुमारे ८० हजार १५६ हेक्टर वर खरीप पिकांची पेरणी झाली होती. दरम्यान ऑगस्ट महिन्यात तालुक्यातील विविध भागात मुसळधार पाऊस होऊन नदी- नाल्यांना पूर आले होते. त्यामुळे बागायती आणि कोरडवाहू शेतजमीन व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन अनेक ठिकाणी नदी-नाल्यांचे पाणी शेतात घुसून शेतजमिनी वाहून गेल्या होत्या. त्यावेळी महसूल व कृषी विभागाने संयुक्तरीत्या ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे केले होते.

आचारसंहितेचा आला होता अडसर?
गेल्या वर्षी आचार संहिता लागण्यापूर्वीच पिकांचे पंचनामे पूर्ण झाले होते.परंतु विधानसभेची धामधूम सुरू होती त्यामुळे मदत कधी मिळेल याविषयी शेतकऱ्यांमध्ये तर्कवितर्क लावला जात होता. त्यात बहुदा आचारसंहितेच्या अडसर होईल असेही सांगितले जात होते.परंतु वर्षांनंतर का होईना शेतकऱ्यांना मदत मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

अशी मिळेल मदत
ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी पीक कर्ज घेतले नाही परंतु त्यांच्या पिकांची अतिवृष्टीमुळे व पुरामुळे किमान ३३ टक्के हानी झाली आहे अशा शेतकऱ्यांना एक हेक्टरच्या मर्यादेत १३ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी नुसार त्या पिकासाठी, क्षेत्रासाठी अनुज्ञेय असलेल्या मदतीच्या दराच्या तिप्पट दराने येणारी रक्कम मदत म्हणून वाटप करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे.

बँकेने वसुली करु नये..
संबंधित बाधितांच्या बँक बचत खात्यात मदतीची रक्कम थेट जमा होणार आहे. कोणत्याही बाधितांना रोखीने किंवा निश्चित स्वरूपात मदत मिळणार नाहीअसेही नमूद आहे. पिकांच्या नुकसानीबाबत ची मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रकमे मधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

२०१९ च्या अतिवृष्टीतील नुकसान अशी...
शेतकरी संख्या-- ९ हजार ७५९
बाधित क्षेत्र--- ७ हजार २६२ हे.
बागायत क्षेत्र-- ३ हजार ८४१ हे.
जिरायत क्षेत्र-- ३ हजार २३८ हे.
अंदाजित अपेक्षित निधी-- ८ कोटी 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada taluka heavy rain farmer loss but no refund goverment