सतरा क्विंटल तांदूळ, सहा हजार किलो तेल 

yuvarang
yuvarang

शहादा : सतरा क्विंटल तांदूळ, तीस क्विंटल गहू, सहा क्विंटल तेल ही यादी आहे ‘युवारंग’च्या किराण्याची! एकूण पाच दिवस रोज दोन वेळा दोन हजार २०० लोकांची भूक भागविण्यासाठी शहादा महाविद्यालयात धान्य आणि इतर खाद्यपदार्थांची बेगमी करण्यात करण्यात आली आहे. 

‘युवारंग’मध्ये सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक आदींच्या भोजनव्यवस्थेत कोणतीही कमतरता होऊ नये, याची दक्षता महाविद्यालय प्रशासनातर्फे घेण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक संवेदनशील मानल्या जाणाऱ्या भोजन सुविधेकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले आहे. डॉ. आय. जी. पटेल यांच्या नेतृत्वाखाली ३० सदस्यांची समिती भोजनव्यवस्थेवर लक्ष ठेवून आहे. 

‘युवारंग’साठी केलेली धान्य आणि अन्य साहित्यांची तरतूद थक्क करणारी आहे. एकूण पाच दिवस चालणाऱ्या जेवणावळीसाठी सतरा क्विंटल तांदूळ, सहा क्विंटल तेल, तीन क्विंटल तूरडाळ, तीस क्विंटल गहू, आठ क्विंटल बाजरी असा साठा केला आहे. रोज बाजारातून अडीच क्विंटल पालेभाजी खरेदी केली जाते. याशिवाय, दुपारच्या जेवणात जिलेबी, गुलाबजाम, बुंदी, मोहनथाळ, मुगाचा शिरा यापैकी एक मिठाई दिली जाते. दुपारी पुरी, तर रात्रीच्या जेवणात भाकरी किंवा पोळी दिली जाते. भाकरीसोबत उडदाची डाळ, शेवभाजी आणि खास गुजराना खाद्यपदार्थ असलेली पाटवड्यांची भाजी दिली जाते. डाळभात, उसळ, पालेभाजी, सॅलर्ड आणि मिठाई असा दररोज दुपारी जेवणाचा ‘मेनू’ आहे. 

दोन हजारांहून अधिक लोकांचा स्वयंपाक आणि भोजनव्यवस्थेसाठी एकूण १५० कर्मचारी कार्यरत आहेत. एकूण आठ मुख्य स्वयंपाकी, पस्तीस मदतनीस महिला अन्न शिजवितात. उर्वरित वाढपी आहेत. रोज २२० ड्रममधून एकूण पाच हजार २०० लिटर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येते. भोजनस्थळी शामियान्यात एकाच वेळी ५०० ते ७०० जणांची बैठकव्यवस्था असून, मुलामुलींसाठी स्वतंत्र शामियाने आहेत. 
भोजनस्थळी सांडपाणी आणि अन्य टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट ही मोठी समस्या असते. शहादा महाविद्यालयात उभारलेल्या स्वयंपाकघरालगत १० बाय १० आकाराचे दोन शोषखड्डे तयार केले असून, त्यात सांडपाणी सोडले जाते. अन्य टाकाऊ पदार्थांची पालिकेच्या खतनिर्मिती प्रकल्पात विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे हा परिसर स्वच्छ राहिल्याचे दिसून येते. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com