शरद पवारांच्या सभेने मरगळलेल्या राष्ट्रवादीला "बूस्टर डोस' 

शरद पवारांच्या सभेने मरगळलेल्या राष्ट्रवादीला "बूस्टर डोस' 

नाशिक - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा शब्द आणि त्यांची रणनीती बदलत्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा श्‍वास बनला होता. पण दोन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या भुजबळांमुळे राष्ट्रवादीचा वारू भरकटला. त्यातूनच सर्व आमदारांची ताकद एकेकाळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीमागे उभ्या करणाऱ्या जिल्ह्यात राष्ट्रवादीला उमेदवार मिळणे मुश्‍कील झाले होते. अशा परिस्थितीतून वाटचाल करणाऱ्या राष्ट्रवादीला अखेर पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या सभेने "बूस्टर डोस' मिळाला. 

भुजबळांच्या अनुपस्थितीत पक्षाचा गाडा रुळावर आणण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे प्रभारीपद देण्यात आले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे यांचेही नाशिककडे लक्ष होते. पण काही केल्या स्थिती सुधारत नाही म्हटल्यावर पक्षाने खांदेपालट करत माजी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे प्रभारीपद सोपवले. प्रदेशस्तरावरून डागडुजी सुरू ठेवली गेली तरी आमदार जयवंत जाधव, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार यांच्यापलीकडे प्रत्यक्ष "फिल्ड'वर काही केल्या राष्ट्रवादीत चैतन्याचे धुमारे फुटत नव्हते. परिणामी महापालिका, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा अपेक्षित "परफॉर्मन्स' झाला नाही. आता काय करायचे? या गंभीर प्रश्‍नाने पक्षांतर्गत काळजी दाटून आली होती. त्यातच पुन्हा भुजबळांच्या अनुषंगाने पक्षातर्फे फारशा गतिमान हालचाली होत नाहीत, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढीस लागली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बघ्याच्या भूमिकेत राहणे पसंत केले. मध्यंतरी भुजबळांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी "अन्याय पे चर्चा' उपक्रम सुरू केला. त्यात राष्ट्रवादीचे नेते गटातटाची भावना दूर ठेवत सहभागी झाले. तरीदेखील राष्ट्रवादीचा माहोल तयार होत नव्हता, ही वस्तुस्थिती सर्वांना दिसत होती. 

भुजबळांच्या आळवल्या गेल्या आठवणी 
राष्ट्रवादीचा कोणताही उपक्रम असला, तरीही छगन भुजबळ स्वतः साऱ्या आघाड्या सांभाळायचे. त्यामुळे खालच्या फळीवर ताण येण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नव्हता. आता त्यांच्या अनुपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या संघर्षयात्रेच्या समारोपाची सभा नाशिकमध्ये घ्यायची म्हटल्यावर स्थानिकांच्या अंगावर वितभर काटे उभे राहिले. यातून मार्ग काढण्यासाठी आमदार जाधव यांनी जयंत पाटील, अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये तयारीची बैठक घेण्याचे प्रयत्न सुरू केले. तोपर्यंत पक्षाध्यक्षांची सभा बी. डी. भालेकर हायस्कूल मैदानावर घेण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर मैदानाची नोंदणी केली गेली. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर नेत्यांना नाशिकमध्ये येणे शक्‍य नाही म्हटल्यावर श्री. जाधव यांनी शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या सहकार्याने चांदवड आणि नाशिकमध्ये जयंत पाटील यांच्या बैठकी घेतल्या. नाशिकमधील बैठक होण्याअगोदर जयंत पाटील यांना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची पाहणी करण्यासाठी नेण्यात आले. बैठक व्यवस्थेचा आराखडा तयार करून तो त्यांच्यापुढे ठेवला. त्याचवेळी जिल्हाभरातील प्रमुख 20 जणांची यादी तयार करून आमदार हेमंत टकले यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली. आमदार जाधवांना अनेक पातळ्यांवर कमीपणा स्वीकारावा लागला. एकूणच काय, तर भुजबळांच्या अनुपस्थितीत एखादी सभा घ्यायची म्हटल्यावर किती कष्ट पडतात, याची प्रचीती दुसऱ्या फळीला आली. समारोपसभेत भुजबळांच्या आठवणी आळवल्या गेल्या. त्यांना तुरुंगात का डांबून ठेवण्यात आले, याची कारणमीमांसा करत पक्षाध्यक्षांनी भुजबळांच्या प्रकृतीविषयी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून व्यक्त केलेल्या चिंतेबद्दलचे मुद्दे चर्चेत आणून भुजबळ समर्थकांची नाराजी निवळण्याचा यशस्वी प्रयत्न केला. 

चूक झाल्याचा संदेश अधोरेखित 
सरकारच्या विरोधात असलेला रोष मांडण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकमधून "लॉंग मार्च' मुंबईकडे रवाना झाला होता. हा "लॉंग मार्च' मुंबईच्या वेशीवर पोचला असतानाच शरद पवारांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचा रोष आळवला गेला. हे कमी की काय म्हणून शेतीचे प्रश्‍न बिकट झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर "पवारसाहेब आम्हाला माफ करा, आमची चूक झाली', अशा आशयाचे फलक जिल्हाभरात झळकले होते. हाच चूक झाल्याचा संदेश श्री. पवार यांच्या सभेच्या अनुषंगाने अधोरेखित झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com