तामथरेत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

चिमठाणे ः शिंदखेडा तालुक्‍यात सलग चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. तामथरे (ता. शिंदखेडा) येथील तरुण शेतकरी भूषण शालिग्राम चौधरी (वय 28) याने आज पहाटे स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. वाढते कर्ज व नापिकीमुळे त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात असून, आज दुपारी तीनला त्याच्यावर तामथरे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. शिंदखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. 

तामथरे येथील भूषण चौधरीची गावशिवारात शेतजमीन आहे. तेथेच त्याने छोटेसे शेड बांधून गायी ठेवल्या आहेत. काल (ता. 11) रात्री नऊला सुमारास गायींची राखण करण्यासाठी भूषण व त्याचा लहान भाऊ महेंद्र, चुलत भाऊ संदीप चौधरी, नितीन चौधरी असे चौघे शेतात गेले व तेथेच झोपले. सकाळी गायींचा हंबरण्याच्या आवाजाने सर्वांना जाग आली असता त्यांना भूषण दिसला नाही. चुलत भाऊ नितीनने समोर पाहिले असता शेतातील लिंबाच्या झाडाला भूषणने गळफास घेतल्याचे दिसले. तिघा भावांनी दूरध्वनीने गावात संपर्क साधून भूषणला शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्‍टरांनी तपासून भूषणला मृत घोषित केले. 
भूषणच्या मागे पत्नी, आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. भूषणला महिन्यापूर्वीच मुलगी झाली होती. त्याची पत्नी बाळंतपणासाठी महालपूर (ता. पारोळा) येथे माहेरी गेलेली होती. भूषणची आई नातीला पाहण्यासाठीही गेली होती. अशा स्थितीत भूषणने आत्महत्या केल्याने गावावर शोककळा पसरली. 

भूषणवर खासगी, बॅंकेचे कर्ज 
भूषणच्या वडिलांच्या नावे चार एकर शेती असून, गेल्या वर्षी शेतात कापूस लागवड केली होती. पावसाअभावी काहीच उत्पादन हाती न आल्याने खासगी देणेकऱ्यांचे देणे व बॅंक ऑफ इंडियाच्या चिमठाणे येथील शाखेतून घेतलेले 70 हजार रुपयांचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत भूषण होता. यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. भूषण कुटुंबातील कर्ता असल्याने त्याच्या आत्महत्येने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज दुपारी तीनला शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. मनोहर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. चिमठाणे दूरक्षेत्राचे सहाय्यक निरीक्षक रमेश चव्हाण तपास करीत आहेत. 
 
Web Title: marathi news shindkheda farmer sucide