Vidhan sabha 2019 : "हायप्रोफाइल' निवडणुकीत विरोधकांचा कस 

विजयसिंह गिरासे
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

राज्यात शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक भाजपचे कॅबिनेट मंत्री रिंगणात असल्याने "हायप्रोफाइल' ठरणार आहे. विकासकामांच्या बळावर अधिकाधिक मताधिक्‍याने विजयाचा चंग पर्यटन, अन्न आणि औषध प्रशासन, राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी बांधला असून, त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे की कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर यापैकी कोण आव्हान देईल याकडे शिंदखेडावासीयांचे लक्ष लागून आहे. 

राज्यात शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक भाजपचे कॅबिनेट मंत्री रिंगणात असल्याने "हायप्रोफाइल' ठरणार आहे. विकासकामांच्या बळावर अधिकाधिक मताधिक्‍याने विजयाचा चंग पर्यटन, अन्न आणि औषध प्रशासन, राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी बांधला असून, त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे की कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर यापैकी कोण आव्हान देईल याकडे शिंदखेडावासीयांचे लक्ष लागून आहे. 

शिं दखेडा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा रंगतदार होणार आहे. भाजपप्रणीत सरकारमधील कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल रिंगणात असल्याने राज्याचे या "हायप्रोफाइल' लढतीकडे लक्ष असेल. पाचशे कोटींहून अधिक विकास निधी खेचून आणत, विविध विकासकामे मार्गी लावत मंत्री रावल यांनी त्यांचा पाया मतदारसंघात भक्कम केला आहे. मंत्रिपदाच्या संधीचे सोने करत त्यांनी मतदारसंघावर भरभक्कम पकड निर्माण केली आहे. असे असताना त्यांना आव्हान देण्यासाठी उत्सुक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर यांच्यापैकी कुणाला आघाडीतर्फे उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

आघाडीचा उमेदवार कोण? 
शिवसेनेने शिंदखेडा मतदारसंघातील जागेवर दावा केला. मात्र, पक्षाचा विद्यमान आमदार असलेली जागा भाजपकडेच राहील, अशी भूमिका या पक्षाकडून जाहीर झाली. त्यामुळे शिवसेनेचा दावा गळाला. या मतदारसंघातील जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसची असून, या पक्षाचा उमेदवार दिला जावा, अशी मागणी करत श्री. बेडसे यांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, मतदारसंघातील अनुकूल स्थिती व पाच वर्षांत मतदारसंघ पिंजून काढल्याने कॉंग्रेसला म्हणजेच या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सनेर यांना उमेदवारी मिळावी, असा एक मतप्रवाह या पक्षाकडून उमटत आहे. त्यामुळे मंत्री रावल यांच्यापुढे बेडसे की सनेर यापैकी कुणाचे आव्हान असेल याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे. 

रिंगणात अनेक इच्छुक 
शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शानाभाऊ सोनवणे, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा शिंदखेड्याचे नगरसेवक विजयसिंह राजपूत या मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीची उमेदवारीसाठी तयारी आहे. शिवाय कॉंग्रेस आघाडीतर्फे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर भामरे यांनीही उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे. अशा घडामोडींमुळे मतदारसंघात कमालीची रंगत निर्माण झाली आहे. मंत्री रावल विविध विकासकामांच्या बळावर विक्रमी मते मिळविण्याच्या प्रयत्नात असतील. भाजपच्या बूथ, पन्ना, शक्ती केंद्रप्रमुखांच्या शिंदखेडा येथील मेळाव्यात राज्यात पहिल्या क्रमांकाची मते, मताधिक्‍य मंत्री रावल यांना मिळेल, असा विश्‍वास राज्य व नाशिक विभागीय वरिष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मंत्री रावल यांनी पायाला भिंगरी बांधत मतदारसंघात जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. त्यांना मंत्रिपद, युती सरकारच्या सत्तेत संधी मिळाल्याने त्यांच्यापुढे विरोधक उमेदवारांचा कस लागणार आहे. 

प्रचाराच्या मुद्यांकडेही लक्ष 
मंत्री रावल यांनी सिंचन, आरोग्य, मूलभूत व पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती, शेती, पर्यटन, शिक्षण, औद्योगिक वसाहतीच्या विकासाला चालना देत रोजगारनिर्मिती, अशा विकासाच्या विविध क्षेत्रांसाठी पाठपुरावा, तसेच निधी मिळवत विकासकामे सुरू केली. दोंडाईचा, शिंदखेडा पालिका, पंचायत समिती, असंख्य ग्रामपंचायती ताब्यात ठेवल्या आहेत. त्यामुळे मंत्री रावल आणि विरोधक उमेदवारांमध्ये प्रचारातील मुद्यांवरून लढत रंगणार असल्याचे चिन्ह आहे. त्याकडेही मतदारांचे लक्ष असेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shindkheda vidhan sabha election