पर्यावरणपूरक जीवनशैलीला संयमाची जोड; कोरोनाला रोखण्यासाठी आदिवासी जीवनशैली ठरतेय उपयुक्‍त 

aadivashi
aadivashi

शिरपूर : तालुक्‍यात कोरोना रुुग्णांचा आकडा चारशेपेक्षा अधिक झाला असतानाच सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आदिवासींमधील पावरा समाजाने अद्याप स्वत:ला कोरोनापासून दूर ठेवले आहे. पर्यावरणपूरक जीवनशैलीला कठोर संयमाची जोड देताना त्यांनी दैनंदिन कामांचे स्वरूप किंचितही बदलू दिले नाही. कोरोनाबाबत प्रतिबंध हाच उपाय या धोरणाने ते अद्याप कोरोनामुक्त राहण्यात यशस्वी ठरले आहेत. 
आदिवासीबहुल शिरपूर तालुक्‍यात कोरोनाचा पहिला रुग्ण 22 एप्रिलला आढळला. प्रशासनाने संबंधित परिसराच्या सीमा सील केल्या. शासकीय आदेशापूर्वीच आदिवासी गावे, पाडे, वस्त्यांनी आठवडेबाजार बंद करण्याचा स्वयंस्फूर्तीने निर्णय घेतला. सार्वजनिक यात्रोत्सव रद्द करण्यात आले. विवाह समारंभ टाळावेत, असा संदेश गावागावातील नायकांमार्फत सर्वांपर्यंत पोचविण्यात आला. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर परराज्यासह शेजारील जिल्ह्यात ऊसतोडी, वीटकामासाठी गेलेले मजूर परतले. त्यांना तपासून 14 दिवस वेशीबाहेर शेतांमध्ये क्वारंटाइन राहिल्याशिवाय गावात येण्यास मनाई करण्यात आली. अनोळखी व्यक्तींना तर साफ प्रवेश नाकारला. 
मुळातच अत्यंत कमी गरजा असलेल्या आदिवासी कुटुंबांनी लॉकडाउन व नंतरच्या काळातही स्वयंपूर्ण होण्यावर भर दिला. दळणासाठी घरांमधील जाती पुन्हा घरघरू लागली. अगदीच नाइलाज झाल्याशिवाय बाजारात खरेदीसाठी जाणे सर्वांनी टाळले. विशेष म्हणजे शहराच्या आठवडेबाजारात भाजीविक्रीत सर्वांत मोठा वाटा असलेल्या आदिवासी विक्रेत्यांनी कमालीचा संयम दाखवत शहर टाळून आपापल्या परिसरातच भाजीपाला विकला. परगावाहून परतलेल्या मजुरांना गावातील शेतकऱ्यांनी धान्य व इतर चीजवस्तूंची मदत करून संकटकाळात सांभाळून घेतले. 
 
अंतराचे काटेकोर पालन : 
आदिवासी वस्त्यांची रचना पाहिली तर त्यांच्या उभारणीतच फिजिकल डिस्टन्सिंगची काटेकोर काळजी घेतल्याचे दिसून येते. खरिपाच्या हंगामात शेतकामासाठी कुटुंबे आपापल्या शेतात स्थलांतरित झाली. शेतात काम करतानाही शारीरिक अंतराचे भान जपण्यात आले. किमान पाच ते सहा महिने पुरेल इतके धान्य कणग्यांमध्ये साठवून ठेवण्याची पारंपरिक सवयही या समुदायाला लॉकडाउन काळात मोठा आधार देऊन गेली. निसर्गपूरक जीवनशैलीत कोरोनापासून दूर राहण्याच्या नियमांचा आपसूक अंतर्भाव झाल्याने हा समूह इतरांच्या तुलनेत संसर्गापासून कितीतरी दूर राहण्यात यशस्वी ठरला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com