बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी; बिबट्या आढळला मृतावस्थेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

शिरपूर : चिलारे (ता. शिरपूर) येथे आज दुपारी गायीचा फडशा पाडल्यानंतर तीन शेतकऱ्यांना जखमी करणारा बिबट्या मृतावस्थेत आढळला. जखमींमधील दोन शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

शिरपूर : चिलारे (ता. शिरपूर) येथे आज दुपारी गायीचा फडशा पाडल्यानंतर तीन शेतकऱ्यांना जखमी करणारा बिबट्या मृतावस्थेत आढळला. जखमींमधील दोन शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 
चिलारे शिवारातील शेतात आज दुपारी काळूसिंह महारु पावरा (वय 42) हे शेजारी पोपट सुरसिंह पावरा (वय 27) व महेंद्र जतन पावरा (वय 30) यांच्यासह विश्रांती घेत होते. गावलगतच्या अनेर अभयारण्यातून आलेल्या बिबट्याने शेतातील गोठ्यात बांधलेल्या गायीवर हल्ला चढविला होता. बिबट्याचा आवाज ऐकून काळूसिंह पावरा काठी घेऊन धावले. मात्र तोपर्यंत बिबट्याने गायीचा फडशा पाडला होता. यानंतर बिबट्याने काळूसिंह पावरा यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्या डोक्‍यावर पंजाचे जोरदार फटका मारल्याने ते गंभीर जखमी झाले. काळूसिंग पावरा यांना वाचविण्यासाठी मदतीला धावलेले पोपट व महेंद्र पावरा यांच्यावर देखील बिबट्याने हल्ला करत जखमी केले. महेंद्र पावराने फोन करून शेजारच्या शेतकऱ्यांना माहिती दिली. यानंतर काही शेतकरी डबे वाजवत, लाठ्याकाठ्या घेऊन येत असल्याचे पाहून बिबट्याने अभयारण्याच्या दिशेने पळ काढला. तिघाही जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काळूसिंग व पोपट पावरा यांची प्रकृती गंभीर असल्याने धुळे येथे रवाना करण्यात आले. 
दरम्यान याबाबत माहिती मिळताच अभयारण्याचे वनक्षेत्रपाल खैरनार तेथे पोहचले. त्यांनी बिबट्याच्या ठशाचा मागोवा घेतला. घटनास्थळापासून काही अंतरावर सुळे (ता. शिरपूर) येथे वनविभागाच्या 969 कंपार्टमेंटजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळला. नर जातीच्या या बिबट्याचे वय तीन वर्षे असल्याचे सांगण्यात आले. त्याचा मृतदेह शिरपूरला शवविच्छेदनासाठी नेण्यात येत असून त्यांनतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. मात्र त्याच्या हल्ल्याचा प्रतिकार करताना वर्मी घाव बसल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. 

Web Title: marathi news shirpur bibtya attack farmer