नागरिकांनो, "लॉकडाउन'चे गांभीर्य समजून घ्या : खासदार डॉ. गावित  

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

पालिकेतर्फे दिवसाआड भाजीबाजार भरवून दिवसभर सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रणात येईल. संबंधित विक्रेत्यांना मास्क घालणे बंधनकारक असणार आहे, असे डॉ. गावित यांनी सांगितले.

शिरपूर : लॉकडाऊनचे गांभीर्य समजून न घेता नागरिक सर्रास रस्त्यावर वावरत आहेत. विशेषत: शिरपूरमधील बेशिस्तीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. "कोरोना'चा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी गरज भासल्यास नंदुरबारच्या धर्तीवर शिरपूरमध्येही पेट्रोल पंप बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकेल, असा इशारा खासदार डॉ. हीना गावित यांनी दिला. 

येथील पालिकेत नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीनंतर त्या बोलत होत्या. बैठकीसाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा महाजन, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, बीडीओ वाय. डी. शिंदे, पालिका मुख्याधिकारी अमोल बागूल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ध्रुवराज वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, सांगवीचे सहायक निरीक्षक अभिषेक पाटील, थाळनेरचे सहायक निरीक्षक सचिन साळुंखे उपस्थित होते. 
पालिकेतर्फे दिवसाआड भाजीबाजार भरवून दिवसभर सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रणात येईल. संबंधित विक्रेत्यांना मास्क घालणे बंधनकारक असणार आहे, असे डॉ. गावित यांनी सांगितले. ग्रामीण भागात नऊ हजारांवर लोक होम क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर आशा स्वयंसेविकांमार्फत निगराणी ठेवली जात आहे. मात्र या कामात ग्रामसेवकांकडून उदासीनता दाखवली जात असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यावर अमरीशभाई पटेल यांनी बीडीओ शिंदे यांना विचारणा केली. ग्रामसेवकांना पत्र दिले आहे, असे उत्तर शिंदे यांनी दिले. 

खासदारांचे निर्देश 
बॅंकेत होणारी गर्दी रोखण्यासाठी ग्रामस्थांना सीएससी सेंटर किंवा बॅंक मित्रांमार्फत रकमेचे वितरण करा, त्या रकमेची मर्यादा वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करा, स्वस्त धान्याचे योग्य वितरण करा, अत्यावश्‍यक कारणाशिवाय बाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, सीमाबंदीचे काटेकोर पालन करा, गरज भासल्यास रुग्णवाहिका सेवेचे सहकार्य घ्या, क्वारंटाइन सेंटरची क्षमता आणि संख्या वाढवा, घरपोच किराणा योजनेसाठी स्वयंसेवक तयार करा, असे निर्देश खासदार डॉ. गावित यांनी दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur corona lockdown heena gavit aavahan