ढाब्यावर थांबला ट्रक...संधी साधत 32 लाखाची सुपारी घेवून फरार 

truck robbery
truck robbery

शिरपूर : मध्यप्रदेशात कच्च्या सुपारीची वाहतूक कायम सुरू असते. त्यानुसार सुपारीने भरलेला ट्रक मध्यरात्री जात असताना चालकाने महामार्गावरील ढाब्यावर जेवण करण्यासाठी ट्रक थांबविला. पण या उभ्या ट्रकची ताडपत्री कापून अवघ्या काही मिनिटात संपुर्ण ट्रक खाली करून सक्रीय असलेली टोळी 32 लाख रूपयांच्या सुपारीचा माल घेवून फरार झाले. 


पळासनेर (ता. शिरपूर) येथून 32 लाख रुपयांची सुपारी चोरून गुजरात राज्यात फरार होण्याच्या प्रयत्नातील आंतरराज्यीय टोळीच्या चोरट्यांना अवघ्या बारा तासांत जेरबंद करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले. महाराष्ट्र-मध्यप्रदेश पोलिसांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली. सर्व संशयित गोधरा (गुजरात) येथील रहिवासी आहेत. 

एक ट्रक खाली करत दुसरा भरला 
महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात कच्च्या सुपारीची वाहतूक करणारा ट्रक शुक्रवारी मध्यरात्री बाराला मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळासनेर येथील एका ढाब्यावर थांबला. जेवण केल्यानंतर चालक तेथेच झोपला. ही संधी साधून संशयितांनी मध्यरात्री ट्रकला बांधलेली ताडपत्री व दोर कापून सुपारीची 64 गोणी काढून घेत दुसऱ्या ट्रक (जीजे 31 टी 0579) मध्ये भरली. तेथून संशयितांनी पोबारा केला. काही वेळाने चालकाला जाग आल्यावर चोरीचा प्रकार उघड झाला. त्याने सांगवी पोलिसांना चोरीची माहिती दिली. 

पोलिसांची तात्काळ कारवाई करत ट्रक पकडला 
सहायक निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. महामार्गावरील कॅनव्हाय व गस्ती पथकांकडून माहिती घेतल्यानंतर ट्रकने मध्यप्रदेशची सीमा पार केल्याचा अंदाज त्यांनी बांधला. सेंधवा (जि. बडवानी) पोलिसांना संशयित ट्रकचे वर्णन व त्यामधील मुद्देमालाची माहिती दिली. सेंधवा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या महामार्ग पथकाचे सहायक उपनिरीक्षक संजीव पाटील, हवालदार अशोक यादव, मुकेश गिरवाल आदींनी महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांच्या तपासणीला सुरवात केली. सकाळी संशयित ट्रक थांबवून झडती घेतल्यानंतर त्यात चोरीचा मुद्देमाल आढळल्याने संशयितांना अटक करण्यात आली. चालक आसिफ अब्दुल अजीज समोल (40), इरफान अब्दुल हमीद मुसलमान (37), इकबाल सुलेमान पटेल (30) व संजय सीताराम वर्णकर (32, सर्व रा.गोधरा, गुजरात) यांचा संशयितांत समावेश आहे. चोरीचा माल गोधरा येथे घेऊन जाण्याचा उद्देश असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. बडवानीच्या अप्पर पोलीस अधीक्षक सुनीता रावत, डीवायएसपी तरुणेंद्रसिंह बघेल यांनी संशयितांची चौकशी केली. जप्त मुद्देमालाची किंमत 32 लाख 40 हजार रुपये आहे. संशयितांचा ताबा घेण्यासाठी सांगवी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक वारे, हवालदार संजीव जाधव व सहकारी सेंधवा येथे रवाना झाले. 
 

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com