महिलेची प्रसूती उपकेंद्राबाहेर...प्रसूतीच्या वेदना अन्‌ उपकेंद्राला कुलूप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

सालदारकी करणाऱ्या कुटुंबातील 21 वर्षीय गरोदर महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिचा पती दुचाकीवरून उपकेंद्रात घेऊन आला. मात्र, उपकेंद्राच्या प्रवेशद्वाराला कुलूप होते. दरम्यान, प्रसूतिवेदना होऊ लागल्याने महिलेची अवस्था बिकट झाली.

शिरपूर : आरोग्य उपकेंद्राच्या प्रवेशद्वाराला कुलूप असल्याने केंद्राबाहेरच खाटांचा आडोसा लावून मजूर महिलेची प्रसूती करावी लागल्याची घटना काल (ता. 17) दुपारी तीनला जातोडे (ता. शिरपूर) येथे घडली. 

नक्‍की वाचा -  पत्नीशी अनैतिक संबंध म्हणून धमकावले...त्याने संपविले जीवन

पंचायत समितीच्या आरोग्य विभागांतर्गत जातोडे येथे उपकेंद्र आहे. जातोडे शिवारात सालदारकी करणाऱ्या कुटुंबातील 21 वर्षीय गरोदर महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिचा पती दुचाकीवरून उपकेंद्रात घेऊन आला. मात्र, उपकेंद्राच्या प्रवेशद्वाराला कुलूप होते. दरम्यान, प्रसूतिवेदना होऊ लागल्याने महिलेची अवस्था बिकट झाली. ही बाब कळताच ग्रामस्थांनी कुलूप तोडून उपकेंद्राबाहेर खाटेचा आडोसा तयार केला. त्यावर महिलांनी साड्या टाकून तात्पुरती सोय केली. स्थानिक आशा स्वयंसेविका व महिलांनी महिलेची प्रसूती केली. त्या महिलेने बाळाला जन्म दिला. 
या उपकेंद्राबाहेर महिलेची प्रसूती झाल्याचे कळताच पंचायत समितीचे माजी सदस्य भरत पाटील, माजी उपसभापती जगतसिंह राजपूत, माजी उपसरपंच देवेंद्र राजपूत आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या प्रकाराची माहिती कळविल्यावर तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी सहकाऱ्यांसह तातडीने पोहोचले. त्यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली. 
जातोडे उपकेंद्रात नियुक्त आरोग्य सेविकेला विचारणा केली असता तिने एका रुग्णाला तातडीच्या उपचारांची गरज असल्याने शहरातील इंदिरा गांधी रुग्णालयात नेल्याचे सांगितले. मात्र, संबंधित आरोग्यसेविका नेहमीच गैरहजर राहत असून, रुग्णांसाठी उपकेंद्र कुचकामी ठरल्याचा आरोप उपस्थितांनी केला. परिसराचा विस्तार लक्षात घेऊन तेथे कायमस्वरूपी डॉक्‍टर नेमावा, अशी मागणी करण्यात आली. 


ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेतली असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. वरिष्ठांकडे अहवाल पाठवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली जाणार आहे. 
- डॉ. प्रसन्न कुलकर्णी, तालुका आरोग्याधिकारी, शिरपूर 

जातोडे उपकेंद्रात कर्मचारी कायम गैरहजर राहत असल्याची तक्रार काल सकाळी जिल्हा परिषद सदस्या अभिलाषा पाटील यांनी केली. याबाबत तातडीने कार्यवाही होणे अपेक्षित आहे. 
- भरत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur hospital lock women dilevary open aria