शिरपूरची मास्क निर्मितीतही झेप...एन 95चे उत्पादन 

mask
mask

शिरपूर : पीपीई सूट्‌सच्या निर्मितीद्वारे देशपातळीवर कोरोनाविरोधातील लढ्यात योद्धा म्हणून ठळकपणे समोर आल्यानंतर येथील कृष्णा कॉटेक्‍स उद्योगातर्फे आंतरराष्ट्रीय निकषांनुसार एन 95 मास्कचे उत्पादन सुरू झाले आहे. देशभरात साखळी हॉस्पिटल्स, कोविड 19 उपचार केंद्रातून या मास्कला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पातळीवरही नागरिकांसाठी एन 95 मास्क वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यात आले. 
निकट संपर्कातून होणारा श्‍वसनमार्गातील संसर्ग रोखण्यासाठी मास्क हा प्रभावी उपाय असल्याचे दिसून आले आहे. त्यातही गर्दीच्या ठिकाणी सर्वसामान्य कापडी मास्कच्या तुलनेत एन 95 मास्क वापरण्यास नागरिक अधिक पसंती देतात. धूलिकण, विषाणू, ड्रॉप्लेट्‌स आदींचा संसर्ग रोखण्यात एन 95 मास्क अधिक प्रभावी ठरले आहे. मात्र मागणीचा गैरफायदा घेऊन एन 95 च्या नावाने विविध प्रकारचे मास्क बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवल्याचे दिसून येते. अगदी 40 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत प्रतिनग दराने या मास्कची विक्री सुरू आहे. सामान्य नागरिकांना एन 95 मास्कचे बारकावे ठावूक नसल्याने त्यांची आर्थिक लूट व निकृष्ट मास्कमुळे संसर्गाचा धोका लक्षात घेऊन कृष्णा कॉटेक्‍सतर्फे प्रमाणित एन 95 मास्क प्रत्येकासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय कार्यकारी संचालक चिंतन पटेल, सहकार्यकारी संचालक तपन पटेल या बंधूंनी घेतला. थेट ग्राहकांना फायदा करून देण्यासाठी सध्या करवंद रस्त्यावरील फार्मसी कॉलेजसमोर आर. सी. पटेल विद्यार्थी वस्तू भांडार येथे माफक दरात या मास्कची विक्री सुरू आहे. 

एन 95 मास्कची वैशिष्ट्ये 
कृष्णा कॉटेक्‍समध्ये पूर्णतः स्वयंचलित यंत्रांवर दररोज 50 हजार एन 95 मास्कचे उत्पादन घेतले जाते. श्‍वसनयोग्य हायड्रोफोबिक बाह्यवरण असलेल्या मास्कमध्ये पाच लेयर्स आहेत. फिल्टरेशनसाठी मेल्टब्लोन फॅब्रिकचा वापर केला असून, अंतरआवरण त्वचेच्या नाजूकतेशी सुसंगत कापडाचे आहे. श्‍वसनक्रिया सुलभतेने व्हावी, यासाठी रेस्पिरेटरही जोडले आहे. जलबिंदूरोधक आवरण, कानात अडकवण्यासाठी मऊ सूत लूप्स, अचूक फिटिंगसाठी नोज क्‍लिप अशी वैशिष्ट्ये एन 95 मास्कमध्ये अंतर्भूत आहेत. डब्ल्यूएचओ, आयसीएमआर आदी संस्थांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या निकषांचे पालन करून या मास्कचे उत्पादन करण्याची दक्षता घेण्यात आली आहे. 

कोविड 19 शी लढा देताना वापरत असलेल्या संसर्ग प्रतिरोधक साधनांचा दर्जा तपासणे आवश्‍यक आहे. ग्राहकांच्या मनस्थितीचा गैरफायदा घेऊन निकृष्ट मास्क एन 95 म्हणून विकले जात असल्याचे संतापजनक प्रकार घडत आहेत. ते रोखण्यासाठी अमरिशभाई पटेल, भूपेशभाई पटेल यांच्या निर्देशानुसार अत्यंत माफक किमतीत उच्च गुणवत्तेचे एन 95 मास्क शिरपूरकरांना उपलब्ध करून दिले आहेत. 
-तपन पटेल, सहकार्यकारी संचालक, कृष्णा कॉटेक्‍स 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com