esakal | शिरपूर फाट्यावर दीड कोटीचा मद्यार्क जप्त !
sakal

बोलून बातमी शोधा

शिरपूर फाट्यावर दीड कोटीचा मद्यार्क जप्त !

उभ्या असलेल्या तीन टँकरना संशयावरून घेराव घातला. त्यातील मद्यार्काची हेराफेरी सुरू असल्याचे दिसून आल्याने पथकाने घटनास्थळावरून तिन्ही वाहनचालकांसह एकूण पाच जणांना ताब्यात घेतले.

शिरपूर फाट्यावर दीड कोटीचा मद्यार्क जप्त !

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर : डिलिव्हरीसाठी जाणारे टँकर मध्येच थांबवून त्यातील मद्यार्काची हेराफेरी सुरू असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा पडला. मुंबईच्या अधिकाऱ्यांनी टँकरचालकांसह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. शहराजवळ आमोदे येथे मंगळवारी सायंकाळी केलेल्या या कारवाईत तीन टँकरसह एक कोटी २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

 
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रामार्गे वाहतूक करणारे टँकर सीमेलगत मद्यार्काची तस्करी करीत असल्याची माहिती मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाचे निरीक्षक संताजी लाड, दीपक परब यांनी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून शहरात प्रवेश करताना रस्त्याच्या डाव्या बाजूला आमोदे शिवारात संगीता लॉन्स व लॉजिंगच्या परिसरात उभ्या असलेल्या तीन टँकरना संशयावरून घेराव घातला. त्यातील मद्यार्काची हेराफेरी सुरू असल्याचे दिसून आल्याने पथकाने घटनास्थळावरून तिन्ही वाहनचालकांसह एकूण पाच जणांना ताब्यात घेतले. तीन टँकरसह एकूण एक कोटी २४ लाख २८ हजारांचा मद्यार्क (ब्लेंड) पथकाने जप्त केला.

संशयितांमध्ये टँकरचालक निलंजन भट्टाचार्य (वय ३०, रा. ब्रह्मपुरी, जि. मेरठ, उत्तर प्रदेश), उदयपाल नागर (४०, रा. पमनिया, जि. अमरोहा, उत्तर प्रदेश), लवजितसिंह खत्री (३२, रा. साकेत, उत्तर प्रदेश), जितेंद्र राजपूत (४१, रा. शिरपूर फाटा) व सुरेश पावरा (२५, रा. आशीर्वाद हॉस्पिटलजवळ, शिरपूर) यांचा समावेश आहे. जप्त केलेले तिन्ही टँकर (यूपी १५, ईटी २६६५; यूपी १५, डीटी ५९९२ व यूपी १५, डीटी ५९९३) मध्य प्रदेशातील मे. ग्रेट गॅलोन व्हेंचर्स लि. (धार) येथून मद्यार्क घेऊन मे. व्हिनब्रोस ॲन्ड कंपनी (पुद्दुचेरी) येथे पोचविण्यासाठी जात असल्याची माहिती तपासाधिकारी तथा दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे यांनी दिली. त्यांच्यासह दुय्यम निरीक्षक काळेल, देशमुख, नाशिक येथील दुय्यम निरीक्षक एल. व्ही. पाटील, सी. एच. पाटील व धुळे पथकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image