पोलिसांतल्या माणुसकीचा दुर्बड्यावासीयांना प्रत्यय 

सचिन पाटील
शनिवार, 14 जुलै 2018

शिरपूर ः पोलिसांवर हल्ला करून सहायक निरीक्षकांसह सहा जणांना गंभीर जखमी करणारे दुर्बड्या (ता. शिरपूर) गाव सांगवी पोलिसांनीच दत्तक घेतले असून, सामाजिक जनजागृतीसह शैक्षणिक व रोजगारपूरक उपक्रमांनी ग्रामस्थांची मानसिकता बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सूडभावना न राखता पोलिसांतल्या माणुसकीचा प्रत्यय आणून देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. 

शिरपूर ः पोलिसांवर हल्ला करून सहायक निरीक्षकांसह सहा जणांना गंभीर जखमी करणारे दुर्बड्या (ता. शिरपूर) गाव सांगवी पोलिसांनीच दत्तक घेतले असून, सामाजिक जनजागृतीसह शैक्षणिक व रोजगारपूरक उपक्रमांनी ग्रामस्थांची मानसिकता बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सूडभावना न राखता पोलिसांतल्या माणुसकीचा प्रत्यय आणून देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. 
गावातील कौटुंबिक वाद सोडविण्यासाठी गेलेल्या सांगवी पोलिसांच्या पथकावर दुर्बड्या येथील जमावाने प्राणघातक हल्ला चढवला होता. त्यात सहायक निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह सहा कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणी 90 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गावात धरपकडीचे सत्र सुरू झाल्याने पोलिसांच्या धास्तीने बहुतांश ग्रामस्थ परागंदा झाले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थितीही रोडावली. 
दुर्बड्यातील घटनेचे समाजशास्त्रीय विश्‍लेषण केल्यानंतर जिल्हा पोलिस उपअधीक्षक संदीप गावित व सहायक निरीक्षक खेडकर यांनी गावात सामाजिक प्रबोधनाची उणीव असल्याचा निष्कर्ष काढला. गाव दत्तक योजनेचे पुनरुज्जीवन करून श्री. खेडकर यांनी स्वतः दुर्बड्या गाव दत्तक घेतले. गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून उपक्रमाला सुरवात झाली. शिक्षणाअभावी माणूस अविचारी बनतो, त्याच्या हातून गैरकृत्ये घडतात. त्यांचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागून संपूर्ण गाव, समाजाची प्रतिमा मलिन होते. शिक्षण घेऊन जबाबदार नागरिक म्हणून स्वतःला घडविणे आवश्‍यक आहे, असे श्री. गावित यांनी सांगितले. ज्यांच्यावर हल्ला केला, तेच गावाच्या कल्याणासाठी धावून आल्याचे पाहून या ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले. 

 

अशी आहे योजना 

दुर्बड्यातील युवकांसाठी आगामी काळात नोकरीविषयक मार्गदर्शन शिबिर, रोजगारपूरक उपक्रम, मेळावे होतील. कायदेविषयक साक्षरतेसाठी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाईल. आदिवासी मुख्य प्रवाहात यावेत यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल. फिरते पोलिस ठाणे योजना राबवून गावातच तक्रारी नोंदवणे व त्यांचे निराकरण करण्याचे धोरण असेल. 

गुन्हेगारांना कायद्याची भीती तर सामान्यांना कायद्याचा आदर वाटायला हवा. गावातील ज्या संशयितांनी हे कृत्य केले, त्यांना कायद्याने शिक्षा होईलच. पण असा अविचार पुन्हा होऊ नये, नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन लाभावे यासाठी हा उपक्रम राबवीत आहोत. 
किरणकुमार खेडकर, सहाय्यक निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे 

Web Title: marathi news shirpur police attack