
गदारोळ वाढत गेल्याचे पाहून अर्जुन टिळे यांनी बंद दाराआड कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेणार असल्याचे जाहीर केले.
शिरपूर : कार्यकर्त्यांची मने आणि मते जाणून घेण्यासाठी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेली बैठक गदारोळ व लॉबिंगमुळेच अधिक गाजली. जिल्हाध्यक्षपदाच्या इच्छुकांनी आपापले समर्थक पेरलेल्या गर्दीमुळे हैराण झालेल्या निरीक्षकांना अखेर बंद दाराआड गटतटांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागले.
वाघाडी टी पॉईंटजवळ मनोमिलन लॉन्समध्ये सोमवारी (ता. ७) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार होती. दुपारी चारची वेळ असताना, निरीक्षक अविनाश आदिक व अर्जुन टिळे सायंकाळी सहाला येऊन पोचले. स्थानिक संयोजकांनी औपचारिक कार्यक्रमाला सुरवात केल्यावर लागलीच माजी युवक जिल्हा उपाध्यक्ष योगेश सनेर यांनी जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे वातावरण तापले. गदारोळ वाढत गेल्याचे पाहून अर्जुन टिळे यांनी बंद दाराआड कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेणार असल्याचे जाहीर केले. निरीक्षक गटांचे म्हणणे ऐकून घेत असताना, व्यासपीठावरून तालुकाध्यक्ष रमेश करंकळ यांनी मनोगत व्यक्त केले.
लॉबिंगची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत. इच्छुकांनी चालवलेल्या लॉबिंगचे प्रतिबिंब शिरपूरच्या बैठकीत पडल्याची चर्चा कार्यकर्त्यांत रंगली होती. आपापले समर्थक निरीक्षकांपर्यंत पोचतील आणि जिल्हाध्यक्षपदासाठी आपलाच नेता कसा योग्य आहे, हे सांगतील. याबाबत पुरेपूर दक्षता घेण्यात आल्याचे दिसून आले. त्यासोबत जिल्ह्यासह तालुका पातळीवर पक्षात सर्वकाही आलबेल नाही, जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यातील दरीही अद्याप सांधली गेलेली नाही, हेही या बैठकीतून स्पष्ट झाले.
राहुल साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, जिल्हा संघटक प्रशांत भदाणे, युवक जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे- पाटील, शिरपूर कारखान्याचे माजी अध्यक्ष वसंतराव पाटील, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज पाटील, संदीप बेडसे, डॉ. जितेंद्र ठाकूर, दिनेश मोरे, प्रशांत दोरीक, श्याम करंकाळ, साक्री तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे, युवक तालुकाध्यक्ष आशीष अहिरे, युवराज राजपूत, शिरीष पाटील, रमाकांत पाटील, दत्तू पाडवी, पद्मसिंह जाधव, पंचायत समिती सदस्य रामकृष्ण महाजन, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
संपादन- भूषण श्रीखंडे