शिरपूरची ग्रीन सिटीकडे वाटचाल 

सचिन पाटील
सचिन पाटील

शिरपूर : उपक्रमांमध्ये स्फूर्ती आणि सातत्य राहिले तर त्याचे चळवळीत रूपांतर होऊ शकते, याचा प्रत्यय शिरपूर शहर आणि तालुक्यात वृक्षारोपणाच्या अभियानातून दिसून येतो. गेल्या दोन वर्षांत तीन लाख रोपांची लागवड करून जगवलेल्या पावणेतीन लाख रोपांचे संगोपन सुरू असतानाच या वर्षी सव्वा लाख वृक्षलागवडीचा संकल्प समोर ठेवून काम सुरू आहे. विविध क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करत असलेले शिरपूर आता पर्यावरणाचा समतोल राखण्यातही महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. शहराची आता ग्रीन सिटीकडे वाटचाल सुरू आहे. 
माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, प्रियदर्शनी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचा संकल्प, सहकार्य आणि सक्रिय सहभागातून तालुकाभरात वृक्षारोपणाची चळवळ व्यापक स्वरूपात वाढली आहे. आठवड्याचा एक दिवस निवडून वृक्षारोपणासाठी अवजारे हाती घेऊन माळराने, टेकड्या, रस्त्याचा काठ आदी मिळेल त्या जागी रोपे लावणारे युवकांचे समूह यंदाच्या पावसाळ्यात जागोजागी पाहायला मिळतात. त्यांचा वेग आणि समर्पण लक्षात घेतले, तर येत्या पाच वर्षांत सातपुड्याच्या कुशीतील सर्वाधिक हरित असलेल्या क्षेत्रात शिरपूरचा नक्कीच समावेश होऊ शकेल. 
वृक्षारोपणाची व्याप्ती वाढविण्यासाठी शतकोटी वृक्षलागवड योजनेसारख्या मोहिमा शासकीय स्तरावरून राबविण्यास सुरवात झाली. मात्र त्यापूर्वी कितीतरी आधी अमरिशभाई पटेल यांनी पालिकेच्या माध्यमातून हा प्रयोग शहरात यशस्वी करून दाखविला. पालिका हद्दीतील ओपन स्पेस, रस्त्यांच्या काठाची मोकळी जागा, नालाकाठ आदी ठिकाणी निंबाची दोन लाख रोपे लावण्यात आली. ती जगविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले. आजमितीस शहरात पूर्ण वाढ झालेली लिंबाचे दीड लाख वृक्ष डौलात उभे आहेत. आजमितीस शिरपूर ग्रीन आर्मी, भूपेशभाई ग्रीन आर्मी, भूपेशभाई फ्रेंड्स सर्कल, खानदेश पर्यावरण संरक्षण मंडळ आदी विविध संस्था शहर आणि तालुक्यात वृक्षारोपणाच्या कार्यात बिनीच्या शिलेदार ठरल्या आहेत. लोकप्रतिनिधींचे सहकार्यही मोलाचे ठरले आहे. 

अत्याधुनिक साहित्याचा वापर 
वृक्षारोपण मोहिमेत खड्डे तयार करण्याचे काम स्वयंचलित यंत्रामुळे सुलभ झाले. भूपेशभाई पटेल यांनी हे यंत्र संघटनांना उपलब्ध करून दिले आहे. रोपांना पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष वाहन असून, एकाच वेळी अनेक रोपांना पाणी देण्याची सोय आहे. माती परीक्षण, लागवड, संगोपन, खते, संजीवके यांसाठी एसव्हीकेएम संचालित कृषी महाविद्यालयाच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभते. 

बंधाऱ्यांचा परिसर बहरणार 
वृक्षारोपण करण्यासाठी शिरपूर पॅटर्न बंधाऱ्याच्या परिसरातील जमीन उपयुक्त ठरली आहे. नाला खोलीकरण करताना त्यातील सुपीक गाळाची माती काठावर पसरल्याने वृक्षलागवडीसाठी अनुकूल ठरते. तालुक्यात आतापर्यंत एकूण २४५ बंधारे झाले असून, टप्प्याटप्प्याने त्यांचे काठ हिरवेगार करण्याचा ग्रीन आर्मीचा संकल्प आहे. बंधाऱ्याच्या काठावरील वृक्षांमुळे भविष्यात पाण्याची धूप होण्याचे प्रमाण कमी होऊन अधिक काळ पाणी टिकून राहणे शक्य होईल. सातपुड्याच्या डोंगररांगेतील नागेश्वरच्या रांगेत झालेले वृक्षारोपण आदर्शवत मानले जाते. तेथे २०१६ मध्ये सात हजार, २०१७ मध्ये पाच हजार, २०१८ मध्ये साडेतीन हजार, २०१९ मध्ये तीन हजार वृक्ष लावले असून, या वर्षी पाच हजार वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com