ट्रकमध्ये अशी लपविली अफूची बोंड की पोलिसही चक्रावले 

afu truck tranceport
afu truck tranceport

शिरपूर  : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकमधून एक क्विंटल अफूची बोंडे तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने जप्त केली. ही कारवाई सांगवी (ता.शिरपूर) गावाजवळ करण्यात आली. घटनास्थळावरून ट्रकचालकाला अटक केली असून ट्रकसह या मुद्देमालाची एकूण किंमत 30 लाख 47 हजार रूपये आहे. 
महामार्गावर अफूची चोरटी वाहतूक सुरू असल्याबाबत सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अभिषेक पाटील यांना माहिती मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्यांसोबत गावाजवळ महामार्गावर अडथळे उभारून वाहनांच्या तपासणीला सुरवात केली. सायंकाळी सातला मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या ट्रक (एमपी 44 एचए 0547)ला पोलिसांनी संशयावरून थांबवले. तपासणी केल्यावर केबिनसह ट्रक रिकामी आढळली. त्यामुळे पोलिसही बुचकळ्यात पडले. 

लोखंडी झाकण उघडले अन्‌ उघडा झाला प्रकार 
ट्रकच्या टपावर जाऊन बारकाईने पाहणी केल्यावर लोखंडी झाकण आढळले. ते काढल्यावर केबिन व मागील भागाच्या दरम्यान छुपा कप्पा तयार केल्याचे दिसले. त्यात प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये अफूची बोंडे दडवली होती. मोजणी केल्यानंतर अफूचे एकूण वजन 104 किलो 700 ग्रॅम भरले. तिची किंमत दहा लाख 47 हजार रूपये आहे. संशयित चालक रघू कन्हय्यालाल दायमा (22, रा.दम्माखेडी ता.सितामहू जि.मंदसौर, मध्यप्रदेश) याच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आज दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी पोलिस ठाण्यास भेट देऊन पोलिसांचे कौतुक केले. अप्पर अधीक्षक राजू भुजबळ, डीवायएसपी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, दीपक वारे, हवालदार संजय देवरे, राजेंद्र सोनवणे, संजीव जाधव, संतोष देवरे, श्‍यामसिंह पावरा, योगेश दाभाडे, राजेंद्र पावरा, सईद शेख यांनी ही कारवाई केली.


मध्यप्रदेशातून चोरटी वाहतुक
मध्यप्रदेशात अफूची बोंडे ‘दोडा’ या नावाने ओळखली जातात. सीमावर्ती भागात अफूची बोंडे भिजवलेले पाणी सर्रास विकले जाते. विशेषत: ट्रकचालक या मादक पेयाचे अधिक ग्राहक आहेत. मोठी मागणी असल्यामुळे शेतांमध्ये चोरून अफू पिकवली जाते. अफूवर प्रक्रिया करण्यासाठी तिची वाहतूक केली जात असल्याचा संशय आहे. सांगवीजवळ जप्त केलेली अफू कोणाकडून घेतली व कोणाला पोहचवली जात होती याचा तपास सुरू असल्याचे अभिषेक पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com