एका दुचाकीचा तपास लावायला गेले आणि अख्खी टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली !   

सचिन पाटील 
Saturday, 31 October 2020

अर्थे, वाघाडी आदी गावांमध्ये विकलेल्या एकूण अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत साडेतीन लाख रुपये आहे. संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

शिरपूर :  सद्या दुचाकी चोरीच्या प्रमाण प्रचंड वाढले असून दुचाकी चोरीच्या टोळ्याच तयार झालेल्या आहे. असेच शिरपुर येथील एका व्यक्तिची दुचाक चोरीला गेल्यानंतर पोलीस तपास लावत असतांना एका युवकाला ताब्यात घेतले. आणि मुन्ना मायकल, टॅब अशी टोपणनावे धारण करून उभी दुचाकी लांबविणाऱ्यांची टोळीच पोलिसांच्या हाती लागली. त्यांच्याकडून माहिती मिळवून चोरीनंतर विक्री केलेल्या तब्बल १३ दुचाकी थाळनेर पोलिसांनी परत मिळविल्या. 

आवश्य वाचा- धुळ्यातील कचरा डेपो होणार मोकळा; बायोमायनिंगच्या कामाला वेग !

सहाय्यक निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या कुशल तपासामुळे दुचाकी चोरांची टोळी हाती लागली. थाळनेर पोलिस दुचाकीचोरांचा शोध घेत असताना चोरी झालेल्यांपैकी एक दुचाकी थाळनेर गावातील युवकाकडे आढळली. त्याची कसून चौकशी केल्यावर ही दुचाकी गावातील मुन्ना तथा मायकल संतोष ईशी (रा. संत गाडगेनगर, थाळनेर) याच्याकडून विकत घेतल्याची माहिती मिळाली. त्याने शिरपूर फाट्यावरील वेलकम हॉटेलजवळून दुचाकी चोरल्याचे कबूल केले. साळुंखे यांनी त्याच्याकडून युक्तिप्रयुक्तीने आणखी माहिती मिळविली. संशयित मनोज तथा टॅब मच्छिंद्र सावळे (रा. थाळनेर) व राकेश पीतांबर बागूल (रा. रामसिंहनगर, शिरपूर) यांनाही ताब्यात घेतल्यानंतर दुचाकीचोरीची मालिकाच उघड झाली. संशयितांनी थाळनेरसह शहादा, अमळनेर, चोपडा, धुळे शहर, वर्शी फाटा, बेटावद आदी भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून माहिती मिळविल्यानंतर तालुक्यातील अर्थे, वाघाडी आदी गावांमध्ये विकलेल्या एकूण अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत साडेतीन लाख रुपये आहे. संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

वाचा- प्रकल्पबाधितांना हक्काची जागेसाठी करावी लागतेय प्रतीक्षा; आता संघर्षाची तयारी !   
 

यांनी केला तपास

पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक अनिल माने, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन साळुंखे, उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, हवालदार दिवाकर कोळी, सिराज खाटीक, विजय जाधव, नीलेश आव्हाड, नरेंद्र पवार, उमेश आळंदे, कृष्णा पावरा, गृहरक्षक दलाचे प्रवीण ढोले, अनिल पावरा, मुकेश कोळी यांनी ही कारवाई केली. 
 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shirpur two wheeler thieves the police found a gang of two-wheeler thieves