श्रीगुरुजी रूग्णालयात कॅन्सरची अवघड,गुंतागुंतीची शस्त्रक्रीया यशस्वी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

नाशिक  शेतात गवत कापण्याचे काम करत असतांना यंत्रांमध्ये केस अडकून झालेली इजा व त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही वर्षानंतर तिथे झालेल्या त्वचेच्या कॅन्सरची आव्हानात्मक व गुंतागुंतीची शस्त्रक्रीया नुकतीच श्रीगुरुजी रूग्णालयात करत रूग्णाला बरे करण्यात आले. 

नाशिक  शेतात गवत कापण्याचे काम करत असतांना यंत्रांमध्ये केस अडकून झालेली इजा व त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही वर्षानंतर तिथे झालेल्या त्वचेच्या कॅन्सरची आव्हानात्मक व गुंतागुंतीची शस्त्रक्रीया नुकतीच श्रीगुरुजी रूग्णालयात करत रूग्णाला बरे करण्यात आले. 

शिर्डी भागात राहणाऱ्या एका अत्यंत गरीब शेतमजूर कुटूंबातील सहा वर्षाच्या लहान मुलींचे केस चारा कापण्याच्या यंत्रात अडकल्यामुळे तिच्या डोक्‍याची त्वचा केसासहित उखडून निघाली. त्यावेळी हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे पूर्ण उपचार करणे त्यांना शक्‍य झाले नाही. त्यामुळे ती जखम पूर्णपणे भरून निघाली नाही. साधारण पंचवीस वर्षानंतर त्या जखमेच्या व्रणामध्ये कॅन्सरसदृश्‍य वाढ दिसू(मार्झिलिस अल्सर-marjolin ulcer) लागली. दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी कॅन्सर निर्माण झाल्याचे निदान झाले. ही जखमी डोक्‍याच्या कवटीच्या साधारण चाळीस टक्के भागात पसरली होती व ती कवटीच्या हाडाला पूर्णपणे मेंदूच्या आवरणापर्यत पोहोचली होती व एका रक्तवाहिनीला चिकटली होती. तिच्या कुटुंबियांनी गेल्या एक वर्षापासून अनेक हॉस्पिटल्स व डॉक्‍टर्सना भेट दिली. पण अशा प्रकारची दुर्मिळ कॅन्सरची केस व त्यासाठी करावी लागणारी अवघड शस्त्रक्रीया यासाठी डॉक्‍टर्स धजावत नव्हते. तसेच या शस्त्रक्रीयेसाठी लागणारा दिड ते दोन लाखांचा खर्च करणे शक्‍य नसल्याने कुटूंब निराश झाले होते. 

नैराश्‍यात अडकलेल्या कुटूंबाला काढले बाहेर 
या नैराश्‍यात अडकलेल्या कुटूंबाला त्यांच्या एका मित्राकडून श्रीगुरुजी रूग्णालयात पाठविले गेले. प्रथमतः डॉ.गिरीष बेंद्रे यांनी या रूग्णांची तपासणी करून शस्त्रक्रीया करण्याचा सल्ला दिला यासाठी त्यांनी रूग्णालयातील पूर्णवेळ कॅन्सर तज्ञ डॉ.अमोघ काळे यांच्याकडे पाठवले. पण कुटूंबियांचा एकच प्रश्‍न होता की खर्च किती येईल. पण या डॉक्‍टरांनी त्यांना ही शस्त्रक्रीया अवघड व आव्हानात्मक असून ती श्रीगुरुजी रूग्णालयातच होईल व तीही महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत निशुल्क...असे आश्‍वासन दिल्याने त्या कुटूंबाला धीर आला. 
 

आव्हान पेलले आणि यशस्वीही केले 
या शस्त्रक्रीयेमध्ये कवटीचा जवळचा अर्धा भाग त्यावरील त्वचेसह व मेंदूच्या आवरणासह काढण्यात आला. मेंदूच्या एका रक्तवाहिनीला हा कॅन्सर चिकटलेला असल्यामुळे त्याला इजा न पोहोचवता हा संपूर्ण कॅन्सर मुळापासून काढण्याचे कौशल्यपूर्ण काम नाशिकम्धील नामवंत मेंदूविकार तज्ञ(न्युरोसर्जन) डॉ.संजीव देसाई यांनी केले. पण यापुढील आव्हान होते. ते म्हणजे इतका मोठा भाग काढल्यानंतर तिथे दुसरीकडील त्वचा लावून मेंदूचा भाग झाकणे. हे आव्हान प्लास्टिक सर्जन डॉ.निलेश पाटील यांनी स्विकारले. त्यासाठी पायांच्या मांडीची त्वचा तिच्या रक्तवाहिनी सोबत काढून ती त्वचा डोक्‍याच्या भागावर लावण्यात आली व ती रक्तवाहिनी मानेच्या रक्तवाहिनी सोबत जोडून रक्तस्त्राव पूर्ववत करण्यात आला. हि क्‍लिष्ट शस्त्रक्रीया साधारण नऊ तास चालली. भूलतज्ञ डॉ.अमोल कदम,डॉ.निलीमा कदम यांनी यामध्ये अतिशय मोलाची भूमिका पार पाडली. 

अशा प्रकारची केस या टिममधील कोणत्याही डॉक्‍टरांनी पंधरा वर्षात पाहिली नव्हती तसेच इतकी आव्हानात्मक शस्त्रक्रीयाही केली नव्हती. आज ही मुलगी पूर्ण बरी झाली असून कुटुंबियासमवेत आनंदात राहत आहे. महात्मा फुले योजनेतील अतिशय माफक पॅकेजमध्ये करून देऊन रूग्णालयाने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच डॉ.संजीव देसाई व डॉ.निलेश पाटील यांनीही मानधनाची पर्वा न करता एका गरजू तरूण मुलीला जीवदान देण्यामध्ये आपला सहयोग दिला. याबद्दल रूग्ण व कुटुंबियांनी सर्वांना धन्यवाद दिले आहे. 
 

Web Title: marathi news shriguruji hospital cancer patient