आजोबाना बघून नेमबाजी शिकले-श्रेया

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

22470 

22470 

पोलिस दलात असलेल्या आजोबांना पाहून नेमबाजी खेळाविषयी निर्माण झालेल्या कुतूहलातून ती शिकत गेली अन्‌ वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागीदेखील झाली. अल्पावधीत पदके जिंकण्याचा धडाका लावताना आगामी काळात होणाऱ्या वर्ल्ड चॅंपियनशिप, एशियन गेम्स स्पर्धेत तिच्याकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. नेमाबाजी खेळात अल्पावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केलेल्या श्रेया गावंडे हिला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाल्याने, यानिमित्त तिच्याशी साधलेला संवाद. .. अरुण मलानी 
------
    श्रेया म्हणाली, की शालेय जीवनात आजोबा राम गावंडे पोलिस दलात अधिकारी असल्याने त्यांच्याकडे बघून नेमबाजी खेळाविषयी आवड निर्माण झाली. इयत्ता सातवीत असताना प्रशिक्षण शिबिर घेतले. शालेयस्तरावर राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास सुरवात केली. पहिल्या दोन-तीन स्पर्धा चांगला अनुभव देणाऱ्या ठरल्या. परंतु त्यानंतर पदक जिंकण्याची सुरवात झाली. साधारणतः दहावीत असताना पुण्यात प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. या सर्व प्रवासात आजोबांसह दिवंगत क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम, प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे श्रेया सांगते. 

पुरस्काराबद्दल श्रेया म्हणाली, की सभोवतालच्या वातावरणातून खेळाची निर्माण झालेली आवड, पावलोपावली मिळालेले पाठबळ यामुळे इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकले. लहानपणापासून क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांचे मार्गदर्शन लाभले असल्याने आज पुरस्कार मिळाल्याच्या बातमीने त्यांना खूप आनंद झाला असता. वर्ल्ड चॅंपियनशिपमधील सहभाग व एशियन चॅंपियनशिपमध्ये मिळालेली दोन सुवर्णपदके, वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धेतील चौथे स्थान अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांतील कामगिरीचा उपयोग भविष्यात नक्‍की होईल. 

 
श्रेयाने आतापर्यंत आंतरराष्ट्रीयस्तरावर तब्बल दहाहून अधिक पदकांची कमाई केलेली आहे. श्रेयाचे वडील संजय गावंडे व्यावसायिक असून, आई श्रद्धा गावंडे या सनदी लेखापाल आहेत. श्रेयाने खेळातून आंतरराष्ट्रीयस्तरावर आपला दबदबा निर्माण केला असून, तिच्याकडून भविष्यात क्रीडाप्रेमींना पदकांची अपेक्षा असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shrya gavande