esakal | तांब्या-पितळेची भांडीनिर्मिती ठप्प 
sakal

बोलून बातमी शोधा

tambe pital

चार महिन्यांपासून काम बंद व पुढेही काम बंदच असल्याने भांडी कारागीर व व्यावसायिकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, भांडी बनविण्याचे काम सोडून अन्य कामाचा शोध घेत आहोत. आठ महिन्यांत दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. 
-अविनाश कासार, व्यापारी, सोनगीर 

तांब्या-पितळेची भांडीनिर्मिती ठप्प 

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर  : राज्यासह परराज्यात तांब्या-पितळेच्या भांडीनिर्मितीमुळे ओळखले जाणारे सोनगीर (ता. धुळे) लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडले आहे. तांब्या-पितळेची भांडी तयार करण्याच्या व्यवसायावर अवलंबून पाचशेहून अधिक कारागीर, लहान व्यावसायिक, भांडी दुकानातील चाकर आदींची उपासमार होत आहे. त्यांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे. आपल्या हातातील कलागुणांमुळे प्रसिद्ध भांडी कारागीर अखेर अन्य व्यवसायाच्या शोधात वणवण भटकत आहेत. 
येथील कारागीरांनी तयार केलेल्या तांबे- पितळाच्या भांड्यांना राज्यभर नव्हे, तर परराज्यातही मागणी आहे. भांडी तयार करून विक्री करणे येथील तांबट, बांगडी व गुजराथी कासार समाजाचा पिढीजात व्यवसाय आहे. इतर काही समाजांनी या व्यवसायात उडी घेतली. सुमारे पाचशे व्यक्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष व्यवसायात असून, त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. 

व्यवसायाला उतरती कळा 
स्टील भांडीनिर्मितीत यंत्रांचे आगमन आदींमुळे येथील व्यवसायाला आधीच उतरती कळा लागली आहे. पोटापुरते मिळत होते तेही लाॅकडाउनमुळे चार महिन्यांपासून बंद झाले. लाॅकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर पावसाळा सुरू झाला. या हंगामात तांब्याची भांडी काळी पडतात, म्हणून ते बनविण्याचे काम बंद राहाते. त्यामुळे दिवाळीपर्यंत काम बंद राहील. त्यामुळे कुठे जावे, काय करावे, स्वतःसह कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल, असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे उभे ठाकले आहेत. 

भांड्यांना सर्वाधिक मागणी 
व्यापारी येथे येऊन कारागिरांकडून हवी ती भांडी तयार करून देशभर विक्री करतात. पूर्वी येथे फक्त कारागीर होते. आता अनेक कारागीर व्यापारी झाले आहेत. भांड्यांसाठी लागणारा कच्चा माल व पत्र्याची चकती पुणे, भंडारा, इंदूर, उज्जैन येथून मागविली जाते. तयार झालेली भांडी टिकाऊ, मजबूत व आकर्षक असतात. तयार भांड्यांना लग्नसराईत सर्वाधिक मागणी असते. शिवाय दिवाळी-दसऱ्याला बऱ्यापैकी मागणी असते. खानदेशात केवळ सोनगीरला कारागीर आहेत. रोजगाराच्या शोधात सर्व कारागीर येथे स्थायिक झाले. त्यामुळे सर्वाधिक व्यापारी येथे येतात. 

कळस डौलाने उभे 
येथे प्रामुख्याने पातेले, परात, घंगाळे, घागर, गुंडा, कळशी, तपेली, बादली व मागणीप्रमाणे भांडी तयार करून मिळतात. येथील कारागिरांनी बनविलेले कळस देशातील बहुसंख्य प्रमुख मंदिरांवर डौलाने उभे आहेत. मात्र, कोरोनामुळे व पुढील भितीमुळे भांड्याचे व्यापारी व ग्राहक फिरकेनासे झाले आहेत. लग्नसराई नसल्याने उलाढालीवर परिणामी झाला. हातावर पोट असणाऱ्या या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासन व प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी आहे. 
 

दृष्टिक्षेपात... 
तांबे कच्चा माल ः ४८० रुपये किलो 
तयार भांडी ः ५०० ते ५८० रुपये किलो 
एकूण कारागीर ः ५०० 
स्थानिक व्यापारी ः १५ 
व्यवसायावर अवलंबून कुटुंबे ः २०० 
उलाढाल ठप्प ः दोन कोटी 
वार्षिक घरटी उलाढाल ः तीन ते पाच लाख रुपये 
सर्वाधिक नेहमीची मागणी ः घागर, गुंडा, कळशी, घंगाळे, तबक 

तयार होणारा माल : तांबे व पितळेची विविध आकार व वजनाची बादली, तपेली, पातेले, घंगाळे, कळशी, घागर, गुंडा, तांब्या (गडू), परात, तबक इत्यादी. कलाकुसरीच्या वस्तू : मंदिराचे भव्य कळस, मूर्तींचे मुखवटे, महादेवाच्या पिंडीचे आवरण, शंकराच्या गळ्यातील नाग, देवदेवतांच्या मंदिरातील कासव, लहान मुलांसाठी भांडी, पूजेचे तबक, समई इत्यादी. 

loading image
go to top