
ग्रामस्थांनी अपार प्रेम दाखवत निरोपासाठी गर्दी केली. तरुणांनी शुभमला खांद्यावर बसवून गावभर मिरविले.
सोनगीर : येथील सुपुत्र देशसेवेसाठी रवाना होत असताना ग्रामस्थांनी वाजतगाजत मिरवणूक काढून त्याला निरोप दिला. येथील शुभम डिगंबरसिंग परदेशी बीएसएफमध्ये भरती झाला. प्रशिक्षणाला रवाना होताना मित्रपरिवार व ग्रामस्थांनी त्याला निरोप देताना ‘भारतमाता की जय’, ‘जय हिंद’ अशा घोषणा दिल्या. घरोघरी सुवासिनींनी आरतीने ओवाळले व शुभेच्छा दिल्या.
शुभम परदेशी प्रशिक्षणासाठी जम्मू भागातील बलगाम येथे रवाना झाला. ग्रामस्थांनी अपार प्रेम दाखवत निरोपासाठी गर्दी केली. तरुणांनी शुभमला खांद्यावर बसवून गावभर मिरविले. ठिकठिकाणी सत्कार होत असल्याचे पाहून त्याची बहीण वैष्णवी, आई सुषमा व वडील डिगंबर परदेशी भावुक झाले. देशसेवेसाठी आपला जन्म झाला असून, मी सैनिक होणार, हे लहानपणापासून स्वप्न असल्याचे शुभम सांगायचा.
घरोघरी रोषणाई
शुभमने त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथील आनंदवन शाळेत केले. जे. आर. सिटी हायस्कूलमध्ये बारावीपर्यंत व येथील महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयात पदवी घेतल्यानंतर त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत घेतली. पंजाबमधील जालंदर येथे भरती झाला. रात्री निघालेल्या शुभमच्या सन्मानार्थ घरोघरी आकाशकंदील, रोषणाई व पणत्या लावल्या होत्या.
संपादन- भूषण श्रीखंडे