अनुत्तीर्ण विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी प्राध्यापिकेचे निलंबन,चौकशीही होणार 

residentional photo
residentional photo

सिडको : बी. कॉम.च्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण केले तसेच पेपर दाखविण्यास तयार नसल्याच्या कारणावरून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कर्मवीर शांतारामबापू वावरे महाविद्यालयातील विक्रांत चंद्रभान काळे (वय 19) याने शनिवारी उचलले. या आत्महत्येस जबाबदार असलेल्या प्रा. एस. एस. पाटील यांना निलंबित करून कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी (ता. 10) महाविद्यालयाच्या आवारात नातेवाइकांनी ठिय्या आंदोलन केले. आक्रमक भूमिका आणि जोरदार घोषणाबाजीने वातावरण तंग बनले. अखेर संस्थेच्या संचालकांसह शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित प्राध्यापिकेच्या निलंबनाचा निर्णय घेतला. तसे पत्र विक्रांतच्या आईला देण्यात आल्यानंतर हे वातावरण शांत झाले. चौकशीसाठी समिती नेमण्याचे ठरले. 


विक्रांतच्या आत्महत्येनंतर त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीने या प्रकरणाची उकल झाली. सकाळी विक्रांतचे नातेवाईक, मित्र तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन त्यांच्या घरापासून महाविद्यालयापर्यंत मोर्चा काढला. संबंधित प्राध्यापिकेवर गुन्हा दाखल करून महाविद्यालयातून निलंबित करावे, विक्रांतला न्याय द्यावा, अशी मागणी करणारे फलक विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते. हा मोर्चा महाविद्यालयात पोचल्यानंतर अंबड पोलिसांनी विद्यार्थ्यांना अडवले. केवळ नातेवाइकांनाच प्रवेश दिला.

 संस्थेचे संचालक नानासाहेब महाले यांनी चर्चा करत प्राध्यापिकेवर कारवाई करण्यासाठी समिती नेमली जाईल, असे सांगितले. मात्र नातेवाईक व आंदोलनकर्त्यांनी त्यास तीव्र विरोध करत निलंबन करा मगच आंदोलन थांबवू, अशी आक्रमक भूमिका घेत ठिय्या मांडला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने संस्थेचे शिक्षणाधिकारी संजय शिंदे, श्री. काजळे यांना बोलविण्यात आले. शिक्षणाधिकारी, संचालक श्री. महाले, त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी दत्ता पाटील यांनी "मविप्र'च्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्याशी चर्चा केली. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रा. एस. एस. पाटील यांना निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर तसे पत्र तयार करून पत्राची एक प्रत विक्रांत याच्या आईला देण्यात आली. यानंतर उपस्थितांनी विक्रांत यास श्रद्धांजली अर्पण केली. आंदोलनात नगरसेवक मुकेश शहाणे, बाळा दराडे, संतोष सोनपसारे, संजय भामरे, भूषण राणे, बाळासाहेब गिते, योगेश बेलदार, सागर नागरे, गणेश सांबरे, आकाश पवार, नितीन अकोलकर, रोहित परदेशी, सागर पवार, सुजित पाटील, नीलेश आहिरे, सायली शिंपी, वैशाली काळे, हर्षदा पाटील यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभाग झाले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com