Vidhan sabha : कर्जमुक्तीचा शब्द पाळला; आता चांगल्या रस्त्यांसह विकासाची हमी देतो : आमदार सुरेश भोळे  

suresh bhole
suresh bhole

"शब्द' देणे आणि तो पाळणे याला जीवनात एक महत्त्व आहे. जो दिलेला शब्द पाळतो, त्याच्यावर विश्‍वास व्यक्त केला जातो. जळगाव महापालिका कर्जमुक्त करण्याचा शब्द आपण गेल्या निवडणुकीत दिला होता. तो आपण पूर्ण करून जळगावकरांना कर्जमुक्त केले आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत असलेले "महापालिकेवर कर्ज' हे वाक्‍य या निवडणुकीतून बाद झाले. आताही आपण जळगावकरांना शब्द देत आहोत, की येत्या काळात जळगावकरांना चांगले रस्ते, मुबलक पाणी, महापालिका दवाखान्यांत दर्जेदार उपचाराच्या सुविधा, तसेच सर्व भागात दररोज स्वच्छता आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत, असा विश्‍वास जळगाव शहर मतदारसंघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार सुरेश भोळे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 

मनपा कर्जमुक्त केली 
जळगाव महापालिकेवर साडेसहाशे कोटीचे कर्ज होते. त्यामुळे राज्यभरात जळगाव महापालिकेवर नामुष्की येत होती. शिवाय, जळगावचा विकास खुंटला होता. कर्ज हेच विकासाआड येत होते. हुडको आणि जिल्हा बॅंकेतून कर्जमुक्त करणे आवश्‍यक होते. जळगावकर जनतेने गेल्यावेळी विश्‍वासाने आपल्याला निवडून दिले होते. त्यांच्या विश्‍वासाला पात्र ठरणे कर्तव्य असल्यामुळे आपण सर्वप्रथम महापालिकेवर असलेल्या कर्जमुक्तीसाठी प्रयत्न केले. पालकमंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने आपण हा विषय मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याकडे लक्ष दिल्यामुळे आज जळगाव महापालिका "हुडको' आणि महापालिका कर्जातून मुक्त झाली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने जळगावच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे. 

वर्षभरात खड्डेमुक्त रस्ते 
विरोधकांकडून शहरातील खड्ड्यांच्या प्रश्‍नावरून करण्यात येणाऱ्या राजकारणाबाबत आमदार भोळे म्हणाले, अमृत योजनेमुळे पहिल्या टप्प्यात 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामामुळे खड्डे पडले असून, जनतेची गैरसोय होते आहे. याची आपल्याला जाणीव आहे, मात्र ही गैरसोय भविष्यात भोगावी लागणार नाही. मलनिस्सारण योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरात नव्याने रस्ते करण्यात येतील. त्यासाठी दोनशे कोटी रुपये मंजूरही करण्यात आले आहेत. येत्या वर्षभरात या योजना पूर्ण करून जळगावकरांना चांगले खड्डेविरहीत मजबूत रस्ते आपण देणार आहोत. 

शाळा, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारणार 
शहरातील महापालिकेच्या शाळा व दवाखान्यांच्या बाबतीत ते म्हणाले, सर्वसाधारण कुटुंबातील मुले आजही महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी आपण या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकडे विशेष लक्ष देणार आहोत. आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून या शाळांमध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. याशिवाय, महापालिकेच्या रुग्णालयात उपचाराच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यावर आपला भर राहणार आहे. त्यासाठी आपण शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करणार आहोत. 

रोजगार, उद्योग वाढीसाठी प्रयत्न 
शहराच्या औद्योगिक विकासाबाबत आमदार भोळे म्हणाले, की औद्योगिक विकास हा खऱ्या अर्थाने शहराचा चेहरा असतो. उद्योग आल्यास त्यातून युवकांना रोजगारही उपलब्ध होतो. त्यामुळे उद्योग वाढीसाठी उमाळा नशिराबाद रस्त्यावर अधिक जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी एमआयडीसी उभारण्यात येईल. तेथे नवीन मोठे उद्योग आणण्यासाठी आपला संकल्प असेल. या जागेसाठी मंजुरी मिळण्याकरिता आपण मागणी केली आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल. यातून उद्योगाचा विकास तर होईलच, शिवाय रोजगारही उपलब्ध होतील. 

जळगावकरांचा आपल्यावर विश्‍वास 
निवडणुकीतील यशाबाबत आमदार भोळे म्हणाले, नगरसेवक पदापासून आपण जळगावकरांची सेवा करण्याचे ध्येय बाळगले आहे. गेल्या निवडणुकीत जनतेने आपल्याला आमदारकीची संधी दिली. आपण जे वचन जळगावकरांना दिले होते, ते पूर्ण केले आहे. आज शिवाजीनगर, पिंप्राळा उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. शहरातील समांतर रस्त्यांचे काम सुरू आहे. याशिवाय, अमृत योजनांचे काम अंतिम टप्प्यात आहे. भुयारी गटारी आणि रस्त्यांचे कामही लवकरच सुरू होईल. येत्या दोन वर्षांत जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलला जाईल, याची आपण ग्वाही देतो. जळगावकरांचा आपल्या शब्दावर विश्‍वास असून, जनता आपल्याला पुन्हा एकदा निवडणुकीत विजयी करून सेवेची संधी देईल, हे निश्‍चित. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com