तळोद्यातील आठ आश्रमशाळा यंदा ‘आयएसओ’ 

सम्राट महाजन
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

तळोदा प्रकल्पातील आश्रमशाळांना ‘आयएसओ’ दर्जा प्राप्त झाल्यामुळे आनंद होणे स्वाभाविक आहे. आश्रमशाळांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आहे. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे व उर्वरित आश्रमशाळांनाही ‘आयएसओ’ दर्जा मिळावा म्हणून मी प्रयत्न करणार आहे. 
- अविशांत पंडा, प्रकल्प अधिकारी, तळोदा 

तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्पातील तालंबा, अलिविहीर, सलसाडी, बोरद, तोरणमाळ, बिजरी, काकर्दा व तलाई, अशा आठ आश्रमशाळांना ‘आयएसओ’ दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे तेथील विद्यार्थ्यांना आता चांगल्या दर्जाच्या भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. दरम्यान, आता शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 
तळोदा तालुक्यातील सलसाडी व बोरद, अक्कलकुवा तालुक्यातील तलांबा व अलिविहीर आणि धडगाव तालुक्यातील तोरणमाळ, बिजरी, काकर्दा, तलाई, अशा आठ आश्रमशाळांनी चालू शैक्षणिक वर्षात ‘आयएसओ’ दर्जा प्राप्त केला आहे. प्रकल्प अधिकारी पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली या आठ आश्रमशाळांनी ‘आयएसओ’चे निकष पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू केली. त्यास संबंधित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षकांची साथ मिळाली. 
संबंधित आश्रमशाळांनी ‘आयएसओ’ मानांकन मिळविण्यासाठी असलेले विविध निकष पूर्ण केले आहेत. त्यात भौतिक सुविधा, विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन, स्वच्छ व सुंदर शाळा, शैक्षणिक वातावरणनिर्मिती, कागदपत्रांची रचना, वृक्षारोपण आदी कार्यांबरोबरच आश्रमशाळेच्या बोलक्या भिंती, गुणवत्तावाढपूरक नावीन्यपूर्ण उपक्रम, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, विविध क्रीडा स्पर्धा घेणे अशा विविध निकषांचा समावेश आहे; त्याचप्रमाणे ‘कराडीपाथ’ या उपक्रमांतर्गत इंग्रजी भाषेचा व भोपाळ येथील एकलव्य फाउंडेशनच्या वतीने विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

एकूण अकरा आश्रमशाळा ‘आयएसओ’ 
तळोदा आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील आठ, अक्कलकुवा तालुक्यातील सतरा व धडगाव तालुक्यातील सतरा, अशा ४२ आश्रमशाळांचा समावेश होतो. यापैकी अक्कलकुवा तालुक्यातील डाब, भगदारी व तळोदा तालुक्यातील शिर्वे, अशा तीन आश्रमशाळांनी ‘आयएसओ’ दर्जा प्राप्त केला. आता आठ अशाप्रकारे एकूण ११ आश्रमशाळांना ‘आयएसओ’ दर्जा मिळाला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news tadoda Ashram school ISO certified